सिंदेवाही,
eopard wreaking havoc सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील नवरगाव उपवनक्षेत्रांतर्गत वाकल गाव व परिसरात गेल्या एका महिन्यापासून सतत दहशत पसरवणार्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर यश आले आहे. सोमवारी सकाळी हा बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजर्यात कैद झाला. गेल्या महिन्याभरापासून या बिबट्याने वाकल गाव व लगतच्या शिवारात धुमाकूळ घातला होता.

रात्रीच्या वेळी गावात शिरून बिबट्या शेळ्या, बकर्या आणि कोंबड्यांवर ताव मारत असल्याने पशुपालकांचे मोठे नुकसान होत होते. बिबट्याच्या सततच्या वावरामुळे शेतकरी, शेतमजूर आणि नागरिक कमालीच्या दहशतीखाली वावरत होते. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणेही धोक्याचे झाले होते. या समस्येचे गांभीर्य ओळखून सिंदेवाही वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तातडीने पावले उचलली. बिबट्याचा वावर असलेल्या संभाव्य ठिकाणी रणनीती आखून पिंजरा लावण्यात आला. वनविभागाच्या सततच्या पाठपुराव्याला अखेर सोमवारी सकाळी यश आले आणि बिबट्या पिंजर्यात अडकला. बिबट्या जेरबंद झाल्याची बातमी वाकलबंद वार्यासारखी पसरताच गावकर्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून वनविभागाच्या तत्पर कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले आहे. जेरबंद केलेल्या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्याची प्रक्रिया वनविभागाकडून सुरू आहे.