मोदींच्या व्हिडिओवरून मेटा अडचणीत!

संसदीय समितीही आक्रमक

    दिनांक :05-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Meta in trouble over Modi's video जंतर-मंतर आंदोलनाशी संबंधित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेसबुक व्हिडिओवर काही काळ निर्बंध लावल्याच्या प्रकरणामुळे मेटाच्या अडचणी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मेटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांची भेट घेतली. मेटाचे मुख्य जागतिक व्यवहार अधिकारी जोएल कॅपलान यांच्या नेतृत्वाखाली झालेली ही बैठक सुमारे ४५ मिनिटे चालली.या बैठकीत फेसबुकवरून व्हिडिओ हटवण्यामागील कारणांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कंपनीने ही कारवाई चुकून झाल्याचे सांगत तांत्रिक बिघाडामुळे संबंधित व्हिडिओ तात्पुरता हटवला गेला होता, असे स्पष्टीकरण दिले. त्यानंतर संबंधित पोस्ट पुन्हा पूर्ववत करण्यात आल्याची माहितीही मेटाने दिली.
 
 
 
Meta in trouble over Modi
 
बैठकीदरम्यान बाल लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्री (CSAM) रोखण्याबाबत फेसबुकसमोरील आव्हाने आणि इतर नियामक मुद्द्यांवरही चर्चा झाली. मेटाचे अधिकारी लवकरच केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांचीही भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, मेटाने या घटनेबद्दल यापूर्वीच दिलगिरी व्यक्त केली असून, व्हिडिओ हेतुपुरस्सर हटवण्यात आला नव्हता, असा दावा केला आहे. मात्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने कंपनीचे हे स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याचे सांगत ते स्वीकारण्यास नकार दिला आहे.या प्रकरणाची संसदीय स्थायी समितीनेही गंभीर दखल घेतली आहे. समितीने मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी तीन दिवसांच्या आत बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी केली आहे. मंत्रालयाच्या सचिवांना पाठवलेल्या पत्रात पंतप्रधानांच्या भाषणाचा व्हिडिओ फेसबुकवरून हटवण्याची घटना अत्यंत गंभीर असल्याचे नमूद करण्यात आले असून, यासाठी जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या अधिकृत व्हिडिओवर झालेल्या या कारवाईमुळे मेटाच्या सामग्री नियंत्रण प्रणाली, तांत्रिक प्रक्रियेची विश्वासार्हता आणि नियामक जबाबदाऱ्यांबाबत नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत.