नाशिक,
Nashik's 'makeover' ahead of Simhastha सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या तयारीला वेग आला असून नाशिकरोड रेल्वे स्थानकासह शहरात विविध विकासकामे युद्धपातळीवर सुरू आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने स्थानकावरील सुविधा विस्तारण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत प्लॅटफॉर्म क्रमांक १ ची लांबी वाढवून तेथे २४ बोगींच्या लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेण्यात आली आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर संपूर्ण कव्हर शेड उभारण्यासाठी ६ कोटी ६४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, फ्लोअरिंगचे नूतनीकरण आणि नवीन टाइल्स बसवण्यासाठी आणखी ४ कोटी ४ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. अशा प्रकारे केवळ प्लॅटफॉर्म क्रमांक ४ च्या विकासासाठी १० कोटी ६८ लाख रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. याशिवाय प्लॅटफॉर्म क्रमांक १, २ आणि ३ वरील जुने पत्रे बदलणे तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा यासाठी ड्रेनेज पाईप्स बदलण्याचे कामही सुरू आहे.

सध्या ५१५ मीटर लांबी असलेल्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ मध्ये मुंबईच्या दिशेने आणखी ४५ मीटरची वाढ करण्यात येणार आहे. हे काम जानेवारी महिन्यात सुरू होऊन एका महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या विस्तारामुळे २४ डब्यांच्या लांब पल्ल्याच्या गाड्या थेट प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर उभ्या राहू शकतील. त्यामुळे प्रवासी, पार्सल विभाग आणि सामान वाहतुकीसाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. कुंभमेळ्याच्या काळात मालधक्क्याच्या गोदामात भाविकांसाठी होल्डिंग एरिया उभारण्यात येणार असून, त्या कालावधीत मालधक्का तात्पुरता बंद ठेवला जाणार आहे.दरम्यान, कुंभमेळ्यातील सुरक्षा आणि गर्दी व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी नाशिक महापालिकेनेही मोठे पाऊल उचलले आहे. पुढील दोन महिन्यांत शहरभर सुमारे १,५०० अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात येणार आहेत. एकात्मिक निगराणी प्रणालीअंतर्गत भविष्यात शहरात एकूण ३,३०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून गर्दीचे नियोजन, वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षा व्यवस्थेवर रिअल-टाइममध्ये लक्ष ठेवले जाणार असून, कुंभमेळ्यापूर्वीच मानक कार्यपद्धतीची (SOP) चाचणीही घेण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना अधिक सुरक्षित आणि नियोजनबद्ध सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.