नवनिधी -मारुतीरायांचा अद्भुत प्रसाद!

    दिनांक :05-Aug-2026
Total Views |
धर्म-संस्कृती
 प्रा. दिलीप जोशी
 
lord maruti आपण सर्व हनुमान चालीसा पठन करताना भगवान हनुमंतरायाचे वर्णन ‘‘अष्टसिद्धी नव निधीचे दाता’’ असे आहे. यातील अष्ट सिद्धी आणि नऊ निधी याबाबत सर्वांना कुतूहल असते. त्यातही सिद्धीबाबत आपण थोडेफार ऐकून आहोत पण आपल्यापैकी बहुतेकांना नवनिधीबाबत कल्पना नसते. त्या नवनिधीबाबत आज आपण चर्चा करू.
 

lord maruti 
 
 
निधी म्हणजे काय?
‘निधी’ शब्द आपण पैसा, संपत्ती, खजिना, कोष या अर्थाने वापरतो. आमदार निधी, खासदार निधी हे पण आपण नेहमीच ऐकतो. कोषाध्यक्ष, खजिनदार म्हणजे निधीचा अधिकारी. आपल्या प्राचीन पुराण ग्रंथात देवांचे खजिनदार कुबेर आहेत. त्यांच्या खजिन्यातील निधी म्हणजे देवांचा कोष होय.
कुबेराच्या खजिन्यात नऊ प्रकारचे निधी आहेत. त्याला नवनिधी म्हणतात. नवनिधीचे खजिनदार कुबेर असले तरी भगवान हनुमान या नवनिधीचे दाता आहेत.
त्या नवनिधी पुढीलप्रमाणे आहेत.
पद्मो महापद्मश्च मकरः कच्छपस्तथा।
नीलो मुकुन्दः शंखश्च नन्दः खर्वश्च नौ निधी॥
१) पद्म २) महापद्म ३) नील ४) मुकुंद ५) नंद ६) मकर ७) कच्छप ८) शंख ९) खर्व
याच नवनिधी सीतामाई आणि भगवान श्रीरामांनी महारुद्र हनुमंतांना दिल्या. याच नवनिधी भगवान मारुतीराय आपल्या भक्तांना प्रसन्न होऊन देतात. म्हणून त्यांना “नवनिधी के दाता’’ म्हणतात.
निधी फक्त भौतिक ऐश्वर्य, धनसंपत्ती, पैसा यांच्याशी संबंधित असेल असे वाटणे साहजिक आहे. पण त्याचा गर्भितार्थ शोधला पाहिजे. आपल्या जीवनात या नवनिधी तीन प्रकारे ऐश्वर्य प्रदान करतात.
१) आत्मिक ऐश्वर्य २) बौद्धिक ऐश्वर्य ३) सांसारिक ऐश्वर्य.
कुबेराच्या खजिन्यात असलेल्या नवनिधी या तिन्ही प्रकारांत आहेत हे लक्षात घ्या.
समजा मारुतीराय प्रसन्न झाले तर सामान्य माणूस सांसारिक ऐश्वर्य देणारी नवनिधीतील निधी मागेल. मध्यम भक्त बौद्धिक ऐश्वर्य देणाऱ्या निधी मागतील तर उच्चकोटीचा भक्त आत्मिक ऐश्वर्य देणाऱ्या नवनिधीतील निधी मागेल. आत्मिक ऐश्वर्य महत्त्वाचे असते पण आपण मात्र सांंसारिक सुखाची कामना करतो.
आपल्या संस्कृतीत आध्यात्मिक ऐश्वर्य, बौद्धिक ऐश्वर्य आणि ऐहिक ऐश्वर्य मानले जाते. त्यांनाच निधी म्हणतात.
नवनिधीतील कोणता निधी काय देतो, याचा विचार करू.
१) पद्म निधी : कुबेराच्या खजिन्यात असलेला हा निधी जर मारुतीरायांनी एखाद्या भक्ताला दिला तर या भक्ताजवळ सुवर्ण, रजतयुक्त धनसंपत्ती असेल. हा भक्त सद्गुणसंपन्न आणि सात्त्विक वृत्तीचा असेल. पद्म म्हणजे कमळ म्हणजे हा भक्त कमळाप्रमाणे सुंदर, शुद्ध आणि समृद्ध असेल. हा निधी ज्याच्याजवळ आहे त्याच्याजवळील संपत्ती पिढ्यानपिढ्या टिकते. हा माणूस दानशूर असतो.
२) महापद्म निधी : महापद्म म्हणजे विशाल कमळ. हा निधी ज्याला प्राप्त होतो ती व्यक्ती प्रचंड संपत्ती आणि विपुल रत्नसंपदायुक्त असते. या निधीचा माणूस सात्त्विक, लक्ष्मीपुत्र आणि रत्न, माणिक, मोती हिरे यांनी संपन्न असतो. या निधीच्या व्यक्तीची संपत्ती सात पिढ्या कायम राहते.
३) नील निधी : नवनिधीतील नीलनिधीधारक व्यक्तीजवळ दुर्मिळ संपत्ती असते.lord maruti ही व्यक्ती सत्त्व आणि रजोगुणी मिश्रित असते. तिच्याजवळ ज्ञान आणि चातुर्य असते. तिची संपत्ती तीन पिढ्या टिकते.
४) मुकुंद निधी : कुबेराच्या खजिन्यातील हा निधी रजोगुणी असला तरी दैवी आशीर्वाद आणि अध्यात्माकडे ओढ असणारा असतो. कला, संगीताकडे ओढा असणारा आणि ऐश्वर्याने परिपूर्ण असतो. राज्यसंग्रही असणाऱ्या या निधियुक्ताची संपत्ती केवळ एक पिढी कायम राहते.
५) नंद निधी : समजा प्रसन्न होऊन हनुमंतांनी हा निधी दान दिला तर त्या भक्ताजवळ माती आणि शेती भरपूर असेल. सदैव आनंदी आणि समृद्ध असणारा हा माणूस राजस वृत्तीचा दीर्घायुषी, कुळाचा आधार आणि कुळाचा उद्धार करणारा असेल.
६) मकर निधी : नवनिधीतील मकर निधी प्राप्त माणूस तामस वृत्तीचा असतो. मात्र त्याच्याजवळ संपत्ती आणि शक्तीचे प्रचंड स्रोत असतात. या निधीत शस्त्र, अस्त्र आणि त्याद्वारे संपत्ती आलेली असते. शत्रूवर भारी पडणारी ही व्यक्ती असून तिचा मृत्यू मात्र वीरमृत्यू म्हणजे युद्ध करताना होतो.
७) कच्छप निधी : ज्या व्यक्तीला हा निधी प्राप्त असतो ती तामसिक असते. तिची संपत्ती स्थिर आणि दीर्घकाळ टिकणारी असते. ही व्यक्ती समृद्धीचे रक्षण करणारी पण संपत्ती लपवून ठेवणारी असते.
८) शंख निधी : हा निधीयुक्त माणूस यश आणि कीर्तियुक्त असतो. तो प्रसिद्धीच्या झोतात असतो. खूप पैसा असला तरी तो त्याचा उपभोग घेत नाही. त्याची संपत्ती फक्त एका पिढीलाच उपयोगी ठरते.
९) खर्व निधी : हा निधी प्राप्त असलेला माणूस व्यापारात वृद्धी करणारा असतो. त्याला अनपेक्षित धन प्राप्त होते. त्याला मिश्रित फळ प्राप्ती असते.
या नवनिधी कुबेराजवळ असल्या तरी त्याला त्या इतरांना वितरित करण्याचा अधिकार नाही. मात्र नवनिधी प्रदान करण्याचा अधिकार महारुद्र हनुमंतरायांना आहे. म्हणूनच आपल्या संस्कृतीत मारुतीरायाची आराधना महत्त्वाची आहे. ती आपण केली पाहिजे म्हणजे आपल्याला नवनिधी प्राप्त होतील.
९८२२२६२७३५