प्योंगयांग,
North Korea's shocking advice उत्तर कोरियामध्ये तीव्र उष्णतेची लाट सुरू असून देशातील अनेक भागांत तापमानाचे नवे विक्रम नोंदवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी उष्णतेचा सामना करण्यासाठी कोणत्या आहाराचा अवलंब करावा, याबाबत सरकारकडून एक वादग्रस्त सल्ला देण्यात आला आहे. नागरिकांनी कुत्र्याच्या मांसाचे सूप सेवन करावे, अशी शिफारस करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. हाँगकाँगस्थित एका वृत्तपत्रानुसार, उत्तर कोरियाच्या सत्ताधारी वर्कर्स पार्टीचे अधिकृत वृत्तपत्र 'रोडोंग सिनमुन'ने रविवारी आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या. या सूचनांमध्ये उष्णतेमुळे होणारे आजार टाळण्यासाठी तसेच उष्माघातापासून बचाव करण्यासाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत.
या मार्गदर्शनात एका वरिष्ठ डॉक्टरांच्या मुलाखतीचाही समावेश करण्यात आला आहे. त्यांनी उष्णतेमुळे होणारा थकवा, उष्माघात आणि त्यातून हृदयरोग तसेच मधुमेहासारख्या आजारांचा धोका वाढू शकतो, असा इशारा दिला आहे.सरकारी वृत्तपत्राने कलिंगड, काकडी आणि मूग यांसारख्या थंडावा देणाऱ्या पदार्थांसह कुत्र्याच्या मांसाचे सूप, माशांची लापशी आणि लाल चण्याची लापशी यांसारख्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करण्याची शिफारस केली आहे.
उत्तर कोरिया सरकार अनेक वर्षांपासून या पदार्थांना आरोग्यासाठी लाभदायक मानत प्रचार करत आहे. मात्र, हे पदार्थ महाग असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असल्याचेही वृत्तात नमूद करण्यात आले आहे. उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगमध्ये कुत्र्याच्या मांसापासून तयार होणाऱ्या पदार्थांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी पाककला स्पर्धाही आयोजित केली जाते. सरकारी पातळीवर या पदार्थाला केवळ पारंपरिक खाद्यसंस्कृतीचाच नव्हे, तर उष्णतेवर मात करण्याचा आणि देशभक्तीचा भाग म्हणूनही सादर केले जात असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.