मंगरूळनाथ शहरात मुक्या जनावरांचा हमरस्त्यावर ठिय्या

वाहतुकीला अडथळा; अपघाताचा धोका वाढला

    दिनांक :05-Aug-2026
Total Views |
मंगरूळनाथ,
obstruction to traffic मंगरूळनाथ शहरातील प्रमुख हमरस्त्यावर मोठ्या प्रमाणात मुक्या जनावरांनी ठिय्या मांडल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. भरदिवसा रस्त्याच्या मध्यभागी तसेच दोन्ही बाजूला गायी व बैल बसल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून, अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत शहरातील मुख्य मार्गांवर जनावरांचा मुक्त संचार सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. दुचाकीस्वार, चारचाकी चालक तसेच पादचार्‍यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेक वेळा अचानक जनावरे रस्त्यावर आल्याने अपघाताच्या घटना घडण्याची शयता नाकारता येत नाही.
 
 
obstruction to traffic
 
शहरातील भटया जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असतानाही संबंधित यंत्रणेकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची नागरिकांमध्ये नाराजी आहे. जनावरांचे मालकही त्यांना रस्त्यावर मोकाट सोडत असल्याने परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. नागरिकांनी नगरपरिषद व संबंधित प्रशासनाने तातडीने विशेष मोहीम राबवून भटया जनावरांचा बंदोबस्त करावा, जनावरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करावी तसेच शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
 
 
रस्ता वाहनांसाठी की जनावरांसाठी?
मंगरूळनाथ शहरातील प्रमुख रस्त्यांवर दररोज दिसणारे हे चित्र प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच संबंधित विभागाने जागे होऊन कायमस्वरूपी उपाययोजना करणे काळाची गरज बनली आहे.