‘यादे रफी सुरसंगम’चा ओम कराळे ठरला विजेता

पूजा शेंद्रे द्वितीय, तर विशिधा वाटकर तृतीय

    दिनांक :05-Aug-2026
Total Views |
वर्धा,
yaadein rafi sursangam विदर्भातील प्रतिभासंपन्न उद्योन्मुख गायक-गायिकांना दरवर्षी मंचसंधी उपलब्ध करून देणार्या प्रथितयश साहित्य कलाशोधक मंचाच्या वतीने दादाजी धुनिवाले देवस्थान सभागृहात महान गायक मोहम्मद रफी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित यंदाच्या विदर्भस्तरीय फिल्मी गीत गायन स्पर्धेने रसिकश्रोत्यांच्या दर्जेदार गीतसंगीताची मेजवानी दिली. अंजनगाव सुर्जी येथील ओम कराळे हा या स्पर्धेचा विजेता ठरला.
 
 
yaadein rafi sursangam
 
यवतमाळ येथील अंध गायिका पूजा शेंद्रे हिने परीक्षकांची मने जिंकत दुसरा क्रमांक तर वर्धा येथील विशिधा वाटकर ही तिसर्या क्रमांकाची मानकरी ठरली. यावेळी वैष्णवी निंबुळकर, तनुश्री सावरकर, हेमंत भिसे, अमोल भोगे, वेदा रोडे, प्रणाली डंभारे, अमित कावळे, समीक्षा मेश्राम, पूजा पोटे हे प्रोत्साहनपर पुरस्काराचे मानकरी ठरले. सर्व विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व रोख बक्षीस देण्यात आले. या स्पर्धेत विदर्भभरातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते.
 
कार्यक्रमाच्या उद्घाटनाला सराफा व्यावसायिक अमोल ढोमणे, वर्धा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण धोपटे, ज्येष्ठ पत्रकार इक्राम हुसैन, पिपरीचे माजी सरपंच सतीश इखार, पत्रकार रुपेश खैरी यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक मोहन अग्रवाल, विशेष उपस्थिती खासदार अमर काळे, नगराध्यक्ष सुधीर पांगूळ, तिरुमल्ला तिरुपती अर्बन कॉपरेटिव्ह बँकेचे विदर्भप्रमुख अभय पुणेवार, शितल ढोमणे, नागपूरचे सुप्रसिद्ध उद्योगपती कमलेश ठवकर, समाजसेवक संदीप पजई, ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
यावेळी खा. अमर काळे म्हणाले, युवकांमध्ये वाढत असलेल्या नैराशाची प्रवृत्ती चिंतानजक आहे. कारंजातील एका युवकाने क्रिकेट संघात निवड न झाल्याने आत्महत्या केली. संघात निवड झाली नाही म्हणून आयुष्य संपत नाही. पुढच्या संधीसाठी जिद्दीने तयारी करणे हाच योग्य मार्ग आहे. अपयशावर मात करण्याची मानसिक ताकद आजच्या पिढीत निर्माण करणे ही काळाची गरज आहे. आयोजनाकरिता साहित्य कलाशोधक मंचाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक सुनील बुरांडे, कार्याध्यक्ष दिलीप मेने, उपाध्यक्ष गिरीश सावळकर, कोषाध्यक्ष प्रशांत चवडे, सचिव प्रभाकर उगेमुगे आणि सर्व सहकार्यांनी सहकार्य केले. उद्घाटन व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे संचालन प्रभाकर उगेमुगे यांनी केले. प्रशांत चवडे यांनी आभार मानले.