पंजाब,
Pakistan behind the Jantar-Mantar पंजाबमधील अमृतसर आयुक्तालय पोलिसांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या दोन दहशतवादी मॉड्यूल्सचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात चार अल्पवयीन आणि पाच प्रौढ अशा एकूण नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून, या कारवाईमुळे संभाव्य मोठा कट उधळल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.अमृतसरचे पोलीस आयुक्त गुरप्रीत सिंग भुल्लर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही मॉड्यूल्सपैकी एका गटाचे काम रेल्वे मार्गांवर कॅमेरे बसवून संवेदनशील हालचालींचे चित्रीकरण करणे होते. हे फुटेज सीमेपलीकडे पाकिस्तानमध्ये पाठवण्याचा त्यांचा उद्देश असल्याचा संशय आहे. पोलिसांना वेळेत माहिती मिळाल्याने आरोपींना कॅमेरे आणि संबंधित साहित्यांसह ताब्यात घेण्यात आले. या कारवाईसाठी लागणारा खर्च हवालामार्फत उपलब्ध करून देण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

दुसरे मॉड्यूल पेट्रोल बॉम्ब तयार करणे आणि त्यांचा वापर करण्याचे प्रशिक्षण घेत असल्याचे तपासात उघड झाले आहे. या गटाला आयएसआयशी संबंधित सूत्रधारांकडून प्रशिक्षण दिले जात होते. तसेच पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांवर हल्ला करण्यासाठी आधी टेहळणी करण्याच्या सूचनाही त्यांना देण्यात आल्याचा आरोप आहे. तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली असून, या गटातील आठ सदस्यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तेथे त्यांना स्थानिक स्तरावर मदत, पेट्रोल बॉम्ब तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि इतर रसद पुरवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या संपूर्ण कारवाईमागे पाकिस्तानस्थित आयएसआयचा एक हँडलर सक्रिय असल्याचा पोलिसांचा विश्वास आहे. पोलिसांच्या मते, आरोपींकडे आवश्यक साहित्य उपलब्ध असले तरी काही कारणांमुळे त्यांचा कट प्रत्यक्षात साकार होऊ शकला नाही. या संपूर्ण नेटवर्कचा भांडाफोड करून संभाव्य दहशतवादी कारवाया रोखण्यात यश आल्याचा दावा अमृतसर पोलिसांनी केला आहे.