पंढरपूर,
Prakshal Puja performed after Ekadashi आषाढी एकादशी पूर्वी दरवर्षी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, चांगला मुहूर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना २४ तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते. त्यानुसार, श्रींचा पलंग परंपरेनुसार काढण्यात आला होता व श्री विठ्ठलास लोड व श्री रूक्मिणीमातेस तक्या देण्यात आला होता. त्यामुळे काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती इत्यादी राजोपचार प्रक्षाळ पूजेपर्यंत बंद ठेवून भाविकांना जास्तीत जास्त वेळ दर्शन उपलब्ध करून देण्यात येत होते.

मुहूर्तानुसार श्री विठ्ठलाची व श्री रूक्मिणी मातेची प्रक्षाळपूजा अनुक्रमे मंदिर समिती सदस्य प्रकाश जवंजाळ व सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते पूर्ण झाली. या पूजेच्या सुरवातीला प्रभारी कार्यकारी अधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते श्रींना पहिले स्नान घालण्यात आले. तसेच, श्री विठ्ठलास सोन्याचा मुकुट, कौस्तुभ मणी, मोत्याचा तुरा, नाम निळाचा, दंडपेट्या जोड मोठा, हिऱ्याचे कंगण जोड, शिरपेच मोठा दहा लोक असलेला, बाजीराव कंठी, मोत्याची कंठी दोन पदरी, मोठी एक पदरी पदकास लोलक असलेली, मस्त्य जोड, तोडे जोड, सूर्य कळ्यांचा हार, पैंजण जोड, अष्टपैलू मण्याची कंठी, आठ पदरी तुळशीची माळ इत्यादी तसेच श्री रुक्मिणी मातेस सोन्याचा मुकुट, वाक्य जोड, तोडे जोड, चांदवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जवेच्या माळ, लक्ष्मी हार, पुतळ्याची माळ, मोहरांची माळ, हायकोल, सरी कंबर पट्टा इत्यादी अलंकार परिधान करण्यात आले.
तसेच मंदिर समितीच्या श्री संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रांमध्ये विशेष भोजन प्रसाद ठेवण्यात आला होता. त्याचा सुमारे १५०० ते २००० भाविकांनी लाभ घेतला. याशिवाय, देवाचा शिणवटा/थकवा घालविण्यासाठी आयुर्वेदीक काढा श्रींना नैवेद्य म्हणून रात्री शेजारतीवेळी दाखविण्यात आला. या पूजेनंतर श्री विठ्ठलास व श्री रुक्मिणी मातेस पहाटे होणारी काकडा आरती, नित्यपूजा, महानैवेद्य, पोषाख, धुपारती व शेजारती इथेपर्यंतचे सर्व राजोपचार परंपरेनुसार सुरू करण्यात आले आहेत. या पूजेच्या वेळी मंदिरात सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्या शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, प्रकाश जवंजाळ, विभाग प्रमुख भीमाशंकर सारवडकर, सहाय्यक विभाग प्रमुख संदीप कुलकर्णी, पांडुरंग दशपुत्रे व पौराहित्य करणारे कर्मचारी उपस्थित होते.