मेळघाटातील वनविश्रामगृहे मोजताहेत अखेरच्या घटका

शासनाचे दुर्लक्ष, ब्रिटिशकालीन वारसा कोसळण्याच्या मार्गावर

    दिनांक :05-Aug-2026
Total Views |
रवी नवलाखे
धारणी
rest-houses-in-melghat मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील शासकीय वनविश्रामगृहे आज अक्षरशः अखेरच्या घटका मोजत असल्याचे पाहायला मिळत आहे. मेळघाटातील बहुतांश विश्रामगृहे सुमारे ५० वर्षांपूर्वी बांधण्यात आली असून काही इमारती ब्रिटिशकालीन आहेत. कालांतराने आवश्यक दुरुस्ती व देखभाल न झाल्यामुळे अनेक विश्रामगृहांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. काही ठिकाणी छत गळत आहे, तर अनेक इमारतींच्या भिंती कमकुवत झाल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

rest house 
 
rest-houses-in-melghat मेळघाटातील खानापूर, बेलकुंड, ढाकणा, पोपटखेडा, रंगूबेली, सेमाडोह, हरिसाल, धुळघाट रेल्वे, वान इत्यादी ठिकाणची वनविश्रामगृहे नियोजनाच्या अभावामुळे दुर्लक्षित आहेत. अनेक ठिकाणी मूलभूत सुविधा नसल्याने ही विश्रामगृहे पर्यटकांना आकर्षित करण्यात अपयशी ठरत आहेत. दरवर्षी देशभरातून वन्यजीव, पक्षी निरीक्षक आणि पर्यावरणाची आवड असलेले पर्यटक मेळघाटात येतात. मात्र, जंगलाच्या सान्निध्यात राहण्यासाठी दर्जेदार व सुरक्षित निवासाची व्यवस्था नसल्याने अनेक पर्यटक नाराजी व्यक्त करतात.
 
rest-houses-in-melghat निसर्गसंपन्न आणि जैवविविधतेने समृद्ध असलेल्या मेळघाटात आधुनिक सुविधांनी सुसज्ज, पर्यावरणपूरक विश्रामगृहे उभारल्यास देश-विदेशातील पर्यटकांची संख्या वाढू शकते. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील आणि पर्यावरण पर्यटनालाही मोठी चालना मिळेल. यासाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सर्व वनविश्रामगृहांचे तातडीने सर्वेक्षण करून त्यांची दुरुस्ती, नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमी, वन्यजीव अभ्यासक आणि स्थानिक नागरिक करीत आहेत.
खानापूरचे वनविश्रामगृह बेवारस
rest-houses-in-melghat तत्कालीन मुख्य वनसंरक्षक श्रीनिवासन रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूर येथे कोट्यवधी रुपयांत अत्याधुनिक वनविश्रामगृह उभारण्यात आले. ऑनलाईन आरक्षणाद्वारे पर्यटकांना सुविधा देण्याचा उद्देश होता. मात्र, आजपर्यंत ते पर्यटकांसाठी खुले झालेले नाही. केअरटेकर व खानसामा पदे रिक्त असल्याने इमारत देखभालीअभावी भंगार पडली आहे.

खानापूर वनविश्रामगृहात पाणी व वीज नसल्याने ते सध्या पर्यटकांसाठी सुरू करता येत नाही. आवश्यक सुविधा उपलब्ध करून ते लवकरच सुरू करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल.

मनोज चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी, ढाकणा