मुंबई,
Send Valmik Karad to Nagpur Jail मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला बीड जिल्हा कारागृहातून नागपूर मध्यवर्ती कारागृहात हलवावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच आरोपीला कथितरीत्या मदत करणाऱ्या कारागृहातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचीही त्यांनी मागणी केली आहे.सुप्रिया सुळे यांनी सामाजिक माध्यमावरील पोस्टद्वारे सांगितले की, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी कारागृह अधीक्षकांना पत्र लिहून वाल्मिक कराडला बीड कारागृहात राजकीय प्रभावाच्या जोरावर नियमबाह्य सुविधा दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
धनंजय देशमुख यांनी आपल्या पत्रात काही गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यानुसार, इतर कैद्यांच्या नावाने तसेच वकिलांच्या सिमकार्डच्या माध्यमातून बाहेरील व्यक्तींशी संपर्क साधला जात असल्याचा आरोप आहे. दुपारच्या बंदीच्या वेळेत अधीक्षक कार्यालयातून नियमबाह्य पद्धतीने व्हिडिओ कॉलची सुविधा दिली जात असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय बराक क्रमांक ९ जवळील दूरध्वनीजवळ सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याचा आणि कारागृहातूनच इतर आरोपींच्या माध्यमातून बीडमधील परिस्थितीवर प्रभाव टाकण्याचा आरोपही करण्यात आला आहे.या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी बीड कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज, कॉल लॉग आणि भेट नोंदवही तातडीने जप्त करून वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच आरोपीला मदत केल्याचा आरोप असलेल्या कारागृह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात तात्काळ फौजदारी गुन्हे नोंदवावेत, असेही त्यांनी म्हटले आहे. देशमुख कुटुंबाला न्याय मिळणे हेच सर्वात महत्त्वाचे असल्याचे सांगत, या प्रकरणात पारदर्शक आणि कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली आहे.