वर्धा,
director wankhede सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक म्हणून २८ एप्रिल २०२३ रोजी निवडून आलेल्या श्याम गुणवंत वानखेडे यांना बाजार समितीच्या संचालक पदावरून कमी करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांनी ३ रोजी निर्गमित केला. विशेष म्हणजे, त्यांनी यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था वर्धा अंतर्गत शाळेत पूर्णवेळ शिक्षक असल्याची माहिती लपविली होती. त्यांच्याविरुद्ध प्राप्त तक्रारीवर दोन्ही बाजूचे म्हणणे जाणून घेतल्यावर जिल्हा उपनिबंधकांनी हा निर्णय दिला.

श्याम वानखेडे यांच्याविरुद्ध प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधकांनी १६ फेब्रुवारी रोजी तक्रारकत्र्याच्या बाजूने निर्णय दिला. संबंधित आदेशानुसार श्याम वानखेडे यांना संचालकपदावरून कमी करण्यात आले होते. या निर्णयाच्या विरोधात श्याम वानखेडे यांनी नागपूर येथील विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे अपिल दाखल केली होती. त्याठिकाणी दोन्ही बाजू जाणून घेतल्यावर विभागीय सहनिबंधक सहकारी संस्थेने श्याम वानखेडे यांना दिलासा मिळेल असा निर्णय दिला. या निर्णयात प्रामुख्याने आक्षेपित आदेश कायदेशीरदृष्ट्या योग्य व न्यायिक नसल्याने रद्द करणे योग्य राहील, तसेच पुन्हा निर्णयासाठी वर्धा येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयास प्रकरण पाठविण्यात आले. त्यावर दोन्ही बाजूचे म्हणणे जाणून घेत ३ रोजी जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांनी श्याम वानखेडे यांना संचालक पदावरून कमी करण्यात येत असल्याचा आदेश पारित केला आहे.