वाशीममध्ये ओबीसी मंडल यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत

स्वतंत्र कॉलम न दिल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

    दिनांक :05-Aug-2026
Total Views |
वाशीम,
obc mandal yatra in washim ओबीसी समाजाच्या जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी विदर्भातील ११ जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार्‍या ओबीसी मंडल यात्रेचे मंगळवार ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी शहरात उत्स्फूर्त वातावरणात स्वागत करण्यात आले. पुसद नाका येथे फटायांची आतषबाजी, घोषणाबाजी आणि जयघोषात यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर शहरातून भव्य रॅली काढण्यात आली असून स्वागत लॉन येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले.
 
 
obc mandal yatra in washim
 
सकल ओबीसी महामोर्चाचे मुख्य संयोजक उमेश कोर्राम यांच्या नेतृत्वाखाली ३ ऑगस्ट रोजी भंडारा येथून या मंडल यात्रेला प्रारंभ झाला. नागपूर, वर्धा आणि यवतमाळ मार्गे वाशीममध्ये दाखल झालेल्या यात्रेचे विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यावेळी एकच पर्व ओबीसी सर्व, ओबीसींची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यानंतर यात्रेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकांना अभिवादन केले. शहरातून मार्गक्रमण करत स्वागत लॉन येथे जाहीर सभा पार पडली. सभेच्या विचारपीठावर मुख्य संयोजक उमेश कोर्राम यांच्यासह विलास काळे, डॉ. रवी जाधव, रामप्रभू सोनोने, प्रा. डॉ. अनिल राठोड आणि डॉ. रामकृष्ण कालापाड यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी विलास काळे यांनी प्रास्ताविकातून मंडल यात्रेची भूमिका, उद्दिष्टे आणि जनजागृती मोहिमेची आवश्यकता विशद केली.
 
 
मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलताना उमेश कोर्राम यांनी ओबीसी समाजाच्या जातनिहाय जनगणनेची आवश्यकता अधोरेखित केली. त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर टीका करत, गेल्या अनेक दशकांपासून ओबीसींची स्वतंत्र जातनिहाय जनगणना झालेली नसल्याचा दावा केला. स्वतंत्र जनगणना कॉलम नसल्यामुळे ओबीसी समाजाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक, सामाजिक व राजकीय नुकसान होत असल्याचाही त्यांनी आरोप केला.
 
 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन धामणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विठ्ठलराव ढगे यांनी मानले. यावेळी सिताराम वाशीमकर, प्रल्हाद पौळकर, शंकर वानखेडे, समाधान गिर्‍हे, मिलिंद सुर्वे, ज्ञानेश्वर वाशीमकर, सुनील जाधव, नागेश काळे, माधवराव शेवाळे, धम्मदास वाकुडे, वैभव उलेमाले, हनुमान सारसकर, गोकुळ आडे, रतनकुमार राठोड, विष्णू राठोड, बळीराम राठोड, कैलास राठोड, अजय सोनूनकर, संदीप चिखलकर यांच्यासह मोठ्या संख्येने ओबीसी समाजबांधव उपस्थित होते. दरम्यान, बुधवारी सकाळी ही मंडल यात्रा मालेगाव व केनवड मार्गे मेहकरकडे रवाना झाली.