नवी दिल्ली,
Sunrisers Leeds routed London Spirit ‘द हंड्रेड’ लीगमध्ये सनरायझर्स लीड्सने विक्रमी फलंदाजी करत स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येची नोंद केली. लंडन स्पिरिटविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स लीड्सने अवघ्या १०० चेंडूंमध्ये २४१ धावा उभारल्या. ‘द हंड्रेड’ स्पर्धेच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वाधिक धावसंख्या ठरली. दोन्ही संघांच्या डावात मिळून ४४५ धावा झाल्या आणि चौकार-षटकारांचा अक्षरशः पाऊस पडला. या सामन्यात सनरायझर्स लीड्सच्या डावाची सुरुवात मिचेल मार्श आणि रायन रिकल्टन यांनी दमदार केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १४८ धावांची भागीदारी करत संघाला भक्कम पाया मिळवून दिला.
मिचेल मार्शने ३७ चेंडूत ७६ धावांची खेळी केली, तर रायन रिकल्टन ४२ चेंडूत ९४ धावांवर नाबाद राहिला. त्यानंतर हॅरी ब्रूकने अवघ्या १८ चेंडूत ५५ धावांची स्फोटक खेळी करत डावाला आणखी वेग दिला. त्याच्या खेळीत ५ षटकार आणि ५ चौकारांचा समावेश होता. यापूर्वी ‘द हंड्रेड’ लीगमधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम ओव्हल इन्व्हिन्सिबल्सच्या नावावर होता. त्यांनी मागील हंगामात वेल्श फायरविरुद्ध २२६ धावा केल्या होत्या. मात्र, सनरायझर्स लीड्सने २४१ धावा करत हा विक्रम आपल्या नावावर केला. या स्पर्धेत एखाद्या संघाने २०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याची ही केवळ नववी वेळ असून, सनरायझर्स लीड्सने प्रथमच २०० धावांचा टप्पा पार केला आहे.
लंडन स्पिरिटच्या गोलंदाजांवर सनरायझर्सच्या फलंदाजांनी जोरदार हल्ला चढवला. लियाम लिव्हिंगस्टोन, ॲडम झाम्पा, जेमी ओव्हरटन आणि डेव्हिड विली यांना मोठ्या प्रमाणावर धावा खर्च कराव्या लागल्या.२४२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लंडन स्पिरिटने चांगला संघर्ष केला. डेव्हिड विलीने ४६ चेंडूत ८३ धावांची दमदार खेळी केली. मात्र, त्याच्या प्रयत्नांनंतरही संघाला २०४ धावांपर्यंतच मजल मारता आली आणि सनरायझर्स लीड्सने ३७ धावांनी विजय मिळवला.या सामन्यात दोन्ही संघांकडून एकूण ३१ षटकार आणि ३८ चौकार लगावण्यात आले. त्यापैकी सनरायझर्स लीड्सने २१ षटकार, तर लंडन स्पिरिटने १० षटकार ठोकले. या विजयानंतर गुणतालिकेत सनरायझर्स लीड्सने पाच सामन्यांत तीन विजयांसह चौथे स्थान मिळवले आहे. दुसरीकडे, लंडन स्पिरिटला पाच सामन्यांत केवळ एकच विजय मिळवता आला असून संघ सातव्या स्थानावर आहे.