'अरीवगम'ने भारताचं 'AI' स्वप्न साकार!

    दिनांक :05-Aug-2026
Total Views |
चेन्नई,
arivagam : तमिळनाडूच्या नवीन प्रशासनाने आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात तंत्रज्ञान आणि प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. देशातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आणि नवसंशोधन शहर 'अरीवगम' उभारण्याची ऐतिहासिक घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या व्यवहार्यता अभ्यासासाठी सरकारने सुरुवातीला पाच कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
 
 
 
AI
 
 
तमिळनाडूचे नवे अर्थमंत्री एम. मेरी विल्सन यांनी विधानसभेत सुधारित अर्थसंकल्प सादर करताना या प्रकल्पाची घोषणा केली. राज्याला अत्याधुनिक तंत्रज्ञान, सखोल-तंत्रज्ञान (डीप-टेक) उद्योग आणि तांत्रिक गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र बनवण्याच्या उद्देशाने हे शहर विकसित केले जाणार आहे. 'अरीवगम' शहरात प्रगत संशोधन, तांत्रिक शिक्षण, कौशल्य विकास आणि औद्योगिक पायाभूत सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जातील.
 
 
 
 
या प्रस्तावित तंत्रज्ञान शहरात कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ, आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र, अर्धसंवाहक (सेमीकंडक्टर) हार्डवेअर तपासणी प्रयोगशाळा आणि अनेक नवसंशोधन केंद्रे उभारली जाणार आहेत. यासोबतच तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक निवासी सुविधा आणि इतर पायाभूत व्यवस्था देखील विकसित केली जाईल. या नवीन प्रकल्पामुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणुकीला मोठा वाव मिळणार असून उच्च-कौशल्यांवर आधारित रोजगाराच्या हजारो नवीन संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे.