कारंजा (घा.),
jio tower cable theft case बोरगाव (ढोले) येथील जिओ टॉवरवरील आर. आर. एच. ५० मीटर केबल चोरी प्रकरणाचा छडा लावत कारंजा पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांच्याकडून १५ हजार रुपये किमतीची केबल तसेच ५० हजार रुपये किमतीची दुचाकी असा ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जुलै रोजी बोरगाव (ढोले) येथील जिओ टॉवरवरील सुपरवायझर चांदबाबू लज्जत खान हे पाहणीकरिता आले असता आर. आर. एच. केबल तुटलेला दिसला. त्यांनी टॉवरची पाहणी केली असता केबल चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी मीटर केबल चोरीची तक्रार कारंजा पोलिसांकडे दिली. या प्रकरणाचा तपास सुरू असताना तांत्रिक माहिती व गोपनीय माहितीच्या आधारे अनंता गोरसे (३२) रा. बेसखेडा ता. वरुड जि. अमरावती, प्रफुल्ल ठाकरे (३२) रा. सेलू काटे जि. वर्धा आणि शितील राऊत (३०) रा. बेलोरा ता. आष्टी जि. वर्धा या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांच्या विरोधात पुरावे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली.
कारवाईदरम्यान चोरट्यांकडून चोरीस गेलेली मीटर केबल व गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी असा ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अग्रवाल, अप्पर पोलिस अधीक्षक वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार प्रल्हाद मदन, नितेश मैदापवार, मंगेश मिलके, दिनेश घसाड यांनी केली.