झारखंडच्या विद्यार्थी आंदोलनाला सोनम वांगचुक यांचा पाठिंबा

    दिनांक :05-Aug-2026
Total Views |
रांची,
Wangchuk supports Jharkhand student movement झारखंडमध्ये जेपीएससी आणि जेएसएससी भरती प्रक्रियेतील कथित अनियमिततेविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचा पाठिंबा मिळाला आहे. रांचीतील आंदोलनाचे नेते देवेंद्र नाथ महातो यांनी ही माहिती दिली. आंदोलनातील विद्यार्थ्यांनी सांगितले की, सोनम वांगचुक यांच्या विचारांनी प्रेरित होऊन ते आपला लढा पुढे नेत आहेत. सरकारने लवकरच मागण्या मान्य केल्या नाहीत, तर पुढील काही दिवसांत आंदोलन तीव्र करत उपोषण सुरू करण्याचा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला आहे.
 

वारं  
 
 
विद्यार्थ्यांनी सांगितले की, सोनम वांगचुक यांच्याशी चर्चा झाली असून लवकरच व्हिडिओ कॉलद्वारे पुढील संवाद होणार आहे. त्यांचा पाठिंबा मिळाल्यानंतर आंदोलनाला अधिक बळ मिळाल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.जेपीएससी आणि जेएसएससीमधील कथित गैरव्यवहाराविरोधातील आंदोलनाचा हा १२ वा दिवस आहे. आंदोलक विद्यार्थी जीवन कुमार यांनी सांगितले की, राज्यातील काँग्रेसचे नेते आणि पक्षाच्या विद्यार्थी संघटनेचे राष्ट्रीय पदाधिकारी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येऊ शकतात. तसेच कोअर कमिटीच्या बैठकीत 'तिरंगा मार्च' काढण्याबाबतही निर्णय घेतला जाणार आहे. आंदोलनातील पाच विद्यार्थी उपोषणाला बसले असून ७ ऑगस्ट रोजी विधानसभेचा घेराव घालण्याचा, तर १० ऑगस्ट रोजी अधिवेशनादरम्यान राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर आंदोलनकर्त्यांना एकत्र आणण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
 
 
आंदोलनकर्त्यांची मुख्य मागणी म्हणजे १४ वी जेपीएससी परीक्षा, जेएसएससी सीजीएल परीक्षा आणि इतर भरती प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततेची सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी करण्यात यावी. भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष होईपर्यंत १४ वी जेपीएससी पूर्वपरीक्षा रद्द करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे.विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, ३०० पैकी २९९ गुण मिळवणाऱ्या एका उमेदवाराची निवड झाली नाही, तर केवळ १०० पैकी ४८ प्रश्न सोडवणाऱ्या काही उमेदवारांची निवड करण्यात आली. त्यामुळे निवड प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
 
 
आंदोलनकर्त्यांनी टीडीपीएल अर्थात मेसर्स टीएसआर डेटा प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या भूमिकेवरही आक्षेप घेतला आहे. इतर काही राज्यांत काळ्या यादीत समावेश असून आणि ओएमआर शीट प्रकरणात सीआयडी चौकशी सुरू असतानाही या संस्थेकडे झारखंडमधील परीक्षा प्रक्रियेची जबाबदारी देण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याची टीकाही आंदोलनकर्त्यांनी केली आहे.दरम्यान, या कथित अनियमितता आणि सुरू असलेल्या सीआयडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर झारखंड लोकसेवा आयोगाने २५ ते २७ जुलै २०२६ या कालावधीत होणाऱ्या १४ व्या संयुक्त नागरी सेवा मुख्य परीक्षेसह एकूण नऊ परीक्षा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.