मुंबई,
100,000 non-Marathi drivers learned Marathi राज्यात व्यावसायिक प्रवासी वाहने चालवणाऱ्या १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी व्यावहारिक मराठीचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले असून, उर्वरित चालकांनीही १५ ऑगस्टपूर्वी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाला' मिळालेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत, महाराष्ट्रात काम करणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषेशी आत्मीयतेने नाते जोडणे आवश्यक असल्याचे सांगितले.सरनाईक म्हणाले की, मराठी ही कोणावर लादली जाणारी भाषा नसून संवाद, संस्कृती आणि आपुलकीचे माध्यम आहे. प्रवाशांशी मराठीत संवाद साधणारा प्रत्येक चालक महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे या अभियानाला मिळालेला प्रतिसाद मराठी भाषेबद्दलचा आदर आणि स्वीकार दर्शवणारा असल्याचे त्यांनी नमूद केले.

या अभियानाच्या आढावा बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप ढवण, मुंबई मराठी साहित्य संघ तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेचे प्रतिनिधी उपस्थित होते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला अमराठी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राज्यभर राबवले जात आहे.
१ मेपासून सुरू झालेल्या या राज्यव्यापी उपक्रमाचा समारोप १७ ऑगस्ट रोजी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार असून, प्रशिक्षण पूर्ण केलेल्या हजारो अमराठी चालकांना अधिकृत प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. दरम्यान, परिवहन विभागाने सर्व संबंधित चालकांनी १५ ऑगस्टपूर्वी प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.