न्यूयॉर्क,
abdul el sayeds big victory in michigan अमेरिकेतील मिशिगन राज्यातील डेमोक्रॅटिक पक्षाच्या सिनेट प्राथमिक निवडणुकीत पुरोगामी नेते अब्दुल अल-सईद यांनी महत्त्वपूर्ण विजय मिळवला आहे. पक्षाचे अधिकृत उमेदवार होण्यासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत त्यांनी प्रतिनिधी हेली स्टीव्हन्स यांचा पराभव केला. या निकालामुळे डेमोक्रॅटिक पक्षातील पुरोगामी गटाला मोठे बळ मिळाल्याचे मानले जात आहे. माजी सार्वजनिक आरोग्य अधिकारी असलेल्या अल-सईद यांच्या विजयामुळे अमेरिकन राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

या निवडणुकीत बाह्य संस्थांनी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला. वृत्तानुसार, अमेरिकन इस्रायल पब्लिक अफेअर्स कमिटीने (AIPAC) हेली स्टीव्हन्स यांच्या प्रचारासाठी तब्बल ३२ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स, म्हणजेच सुमारे ३०४ कोटी रुपये खर्च केले. तरीही अल-सईद यांनी विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. निकालानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी हा निकाल रिपब्लिकन पक्षासाठी "खूप चांगली बातमी" असल्याचे म्हटले. आपल्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी अब्दुल अल-सईद यांच्यावर टीका करत त्यांना "कम्युनिस्ट" असे संबोधले तसेच ज्यू आणि इस्रायलविरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप केला. या निकालामुळे डेमोक्रॅटिक पक्षाची धोरणे आणखी डावीकडे झुकतील, असा दावाही त्यांनी केला.
सुरुवातीच्या जनमत चाचण्यांमध्ये अल-सईद यांना आघाडी दाखवली जात होती. मात्र प्रत्यक्ष मतदानात दोन्ही उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत झाली. प्रचारादरम्यान आरोग्यसेवा, स्थलांतर आणि इस्रायलसंबंधी धोरणांवर दोन्ही बाजूंमध्ये तीव्र वाद झाले. हेली स्टीव्हन्स आणि त्यांच्या समर्थकांनी अल-सईद यांच्यावर ज्यूविरोधी आणि महिलांविरोधी भूमिकेचे आरोप केले, तर अल-सईद यांच्या समर्थकांनी स्टीव्हन्स यांच्या प्रचारातून इस्लामविरोधी वातावरण निर्माण केल्याचा आरोप केला. या निकालामुळे डेमोक्रॅटिक पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांनाही धक्का बसला आहे. पक्षाचे अल्पसंख्याक नेते चक शुमर आणि मिशिगनच्या गव्हर्नर ग्रेचेन व्हिटमर यांनी हेली स्टीव्हन्स यांना पाठिंबा दिला होता. आता सार्वत्रिक निवडणुकीत अब्दुल अल-सईद यांचा सामना रिपब्लिकन नेते माईक रॉजर्स यांच्याशी होण्याची शक्यता आहे. मिशिगन हे अमेरिकेतील महत्त्वाचे स्विंग राज्य मानले जात असल्याने या निवडणुकीचा निकाल सिनेटमधील सत्तासमीकरणावर परिणाम करू शकतो.
दरम्यान, मिशिगनमधील आणखी एका प्राथमिक निवडणुकीत विद्यमान काँग्रेस सदस्य श्री ठाणेदार यांचा डोनावन मॅकिनी यांनी पराभव केला. डेमोक्रॅटिक सोशलिस्ट गटाच्या उमेदवाराकडून पराभूत होणारे ठाणेदार हे या निवडणुकीतील दुसरे विद्यमान काँग्रेस सदस्य ठरले. विश्लेषकांच्या मते, अब्दुल अल-सईद यांच्या विजयामुळे डेमोक्रॅटिक पक्षाच्या वैचारिक दिशेबाबतची चर्चा अधिक तीव्र होण्याची शक्यता असून त्याचा प्रभाव भविष्यातील, विशेषतः २०२८ च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या रणनीतीवरही पडू शकतो.