अमृता धोंगडे खलनायिकेच्या भूमिकेत!

    दिनांक :06-Aug-2026
Total Views |
मुंबई
मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अमृता धोंगडे तब्बल दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे. १० ऑगस्टपासून स्टार प्रवाहवर सुरू होणाऱ्या 'आमच्या लाडक्या नाईक बाई' या नव्या मालिकेत ती दर्शना लाड उर्फ लाडबाई या खलनायिकेच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या मालिकेत दर्शना लाड ही वरकरणी गोड बोलणारी, मात्र स्वभावाने अत्यंत धूर्त आणि कपटी महिला म्हणून दाखवण्यात आली आहे. एका राजकीय पक्षाच्या वतीने गावातील जमिनींवर ताबा मिळवण्याच्या उद्देशाने ती गावात दाखल होते. आपल्या बोलण्याच्या कौशल्याने आणि चलाख डावपेचांनी ती गावकऱ्यांचा विश्वास संपादन करते. नाईक बाईंच्या आयुष्यात नवनवीन संकटे निर्माण करत त्यांच्यासमोर मोठी आव्हाने उभी करण्याची भूमिका लाडबाई साकारणार आहे.
 
 
amruta
 
या नव्या भूमिकेबद्दल बोलताना अमृता धोंगडे म्हणाली की, दोन वर्षांनंतर पुन्हा मालिकेतून प्रेक्षकांसमोर येताना खूप उत्सुकता वाटत आहे. 'दर्शना लाड' ही व्यक्तिरेखा तिच्यासाठी पूर्णपणे वेगळी आणि आव्हानात्मक आहे. गोड बोलणाऱ्या या पात्राच्या प्रत्येक कृतीमागे वेगळा हेतू दडलेला आहे. कारकिर्दीत प्रथमच खलनायिकेची भूमिका साकारत असल्याने हा अनुभव खास असल्याचे तिने सांगितले. प्रेक्षकांना ही भूमिका नक्कीच आवडेल, असा विश्वासही तिने व्यक्त केला. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री ऐश्वर्या नारकर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. त्या साकारणाऱ्या नाईक बाई या केवळ शिक्षिका नसून विद्यार्थ्यांना संस्कार, आत्मविश्वास आणि शिक्षणाची प्रेरणा देणाऱ्या आदर्श व्यक्तिमत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. घरातील जबाबदाऱ्या सांभाळत शेकडो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी त्या अहोरात्र मेहनत घेत असल्याचे मालिकेच्या कथानकात दाखवण्यात आले आहे.