बाबरचा दुहेरी जल्लोष; विजयासह विक्रमाचीही बरोबरी

    दिनांक :06-Aug-2026
Total Views |
पोर्ट ऑफ स्पेन,
babars double celebration वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने दमदार कामगिरी करत ८ गडी राखून विजय मिळवला आणि दोन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. या विजयात कर्णधार बाबर आझम आणि अब्दुल्ला शफीक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शफीकने पहिल्या डावात नाबाद १६० धावांची शानदार खेळी केली, तर बाबरने ८८ धावांचे योगदान दिले. पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावातही बाबरने अर्धशतक झळकावले होते.
 
babars double celebration
 
संपूर्ण मालिकेत बाबर आझमची फलंदाजी सातत्यपूर्ण राहिली. त्याने चार डावांत ९६.५० च्या सरासरीने १९३ धावा करत मालिकेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू जस्टिन ग्रीव्ह्स याच्यासोबत संयुक्तपणे 'प्लेअर ऑफ द सिरीज' पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 
या पुरस्कारासह बाबर आझमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहाव्यांदा 'प्लेअर ऑफ द सिरीज' किताब पटकावला. त्यामुळे त्याने पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान आणि महान वेगवान गोलंदाज वसीम अक्रम यांच्या प्रत्येकी १० मालिकावीर पुरस्कारांच्या विक्रमाशी बरोबरी केली. या यादीत वकार युनिस ९ पुरस्कारांसह चौथ्या स्थानावर आहे. आणखी एक मालिकावीर पुरस्कार मिळवण्यात बाबर यशस्वी ठरल्यास तो इम्रान खान आणि वसीम अक्रम यांना मागे टाकत या विक्रमाचा एकमेव मानकरी बनेल.
 
विशेष म्हणजे, कसोटी क्रिकेटमधील बाबर आझमचा हा पहिलाच 'प्लेअर ऑफ द सिरीज' पुरस्कार आहे. यापूर्वी त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाच, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये चार वेळा मालिकावीर पुरस्कार जिंकले आहेत. दरम्यान, या विजयामुळे पाकिस्तानने सलग आठ कसोटी सामन्यांतील पराभवांची मालिका अखेर संपुष्टात आणली. तसेच पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर तब्बल ४९ वर्षांनंतर पाकिस्तानने कसोटी सामना जिंकण्याचा पराक्रम केला. या मैदानावर पाकिस्तानचा यापूर्वीचा शेवटचा विजय १९७७ साली झाला होता. दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी वेस्ट इंडिजने पाकिस्तानसमोर ७५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पाकिस्तानने केवळ दोन गडी गमावत हे लक्ष्य सहज गाठले आणि संस्मरणीय विजयाची नोंद केली.