मुंबई,
Bank attaches Rajpal Yadav's property बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. चेक बाऊन्स प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर आता सेंट्रल बँक ऑफ इंडियाने त्यांच्या दोन गहाण मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे. १६.६१ कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड न झाल्याने बँकेने संबंधित मालमत्तांचा ताबा घेतला असून ९ सप्टेंबर रोजी त्यांचा लिलाव होणार आहे. यासंदर्भातील नोटीसही संबंधित मालमत्तांवर लावण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, लिलावासाठी ठेवलेल्या दोन मालमत्तांपैकी एक उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील कचहरी रोड परिसरात असून दुसरी मुंबईतील वांद्रे आणि वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात आहे. हे कर्ज राजपाल यादव यांनी पत्नी राधा यादव आणि आई गोदावरी यांच्या नावावर सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेकडून घेतले होते. मात्र, निर्धारित मुदतीत कर्जाची परतफेड न झाल्याने बँकेने कायदेशीर कारवाई सुरू केली.

हे संपूर्ण प्रकरण २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अता पता लापता' या चित्रपटाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः राजपाल यादव यांनी केले होते. चित्रपटाच्या निर्मितीसाठी बँकेकडून कर्ज घेण्यात आले होते. मात्र, चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्यानंतर कर्जाची परतफेड होऊ शकली नाही. त्यानंतर व्याज वाढत गेले आणि थकीत रकमेचा आकडा १६.६१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला.यापूर्वीही या प्रकरणात दिलेले धनादेश वटले नसल्यामुळे राजपाल यादव यांच्याविरोधात न्यायालयीन लढाई सुरू झाली होती. १० जुलै रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने चेक बाऊन्स प्रकरणात त्यांना दोषी ठरवत कारावासाची शिक्षा कायम ठेवली होती. याआधीही त्यांना याच प्रकरणात तुरुंगवास भोगावा लागला होता. अनेकदा थकबाकी फेडण्याचे आश्वासन दिल्यानंतरही संपूर्ण रक्कम जमा न झाल्याने बँकेने मालमत्तांच्या लिलावाचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर राजपाल यादव यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, त्यांचे भाऊ श्रीपाल यादव यांनी हे प्रकरण जुने असून बँकेसोबत तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे सांगितले आहे.