सीजेपीच्या बैठकीनंतर वाद उफाळला

पदवाटप आणि निर्णयप्रक्रियेवर कार्यकर्त्यांनी उपस्थित केले प्रश्न

    दिनांक :06-Aug-2026
Total Views |
छत्रपती संभाजीनगर,
Controversy after CJP meeting नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणानंतर देशभर चर्चेत आलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (सीजेपी) छत्रपती संभाजीनगर येथील बैठकीनंतर पक्षात अंतर्गत वाद समोर आला आहे. बुधवारी अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी सुमारे सहा तास बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाच्या पुढील वाटचालीसह विस्ताराच्या आराखड्यावर चर्चा करण्यात आली. सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रंका यांनी या बैठकीनंतर पक्षाकडून मोठी घोषणा केली जाणार असल्याची माहिती दिली होती.
 
 
 
Controversy after CJP meeting
 
मात्र, बैठकीनंतर गुजरातमधून आलेल्या दोन कार्यकर्त्यांनी अभिजीत दिपके यांच्या घराबाहेर आंदोलन सुरू केले. राहुल पांड्या आणि मनीष ब्रह्मभट अशी या दोघांची नावे असून, त्यांनी आपण दिल्लीतील जंतरमंतर आंदोलनाच्या सुरुवातीपासून सक्रिय सहभागी असल्याचा दावा केला. या दोन्ही कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेतले. त्यांच्या म्हणण्यानुसार, पक्षात लोकशाही पद्धतीने निर्णय घेतले जात नाहीत. महत्त्वाची पदे केवळ अभिजीत दिपके यांच्या निकटवर्तीयांना, नातेवाईकांना आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तींना दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून आपण सक्रिय असूनही आपल्या योगदानाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
 
 
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी सांगितले की, रात्री एक वाजेपर्यंत त्यांनी अभिजीत दिपके यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना भेट मिळाली नाही. पक्षात पारदर्शकता आणि जबाबदारी असणे आवश्यक असल्याचे सांगत, "ज्या पद्धतीने आम्ही केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे उत्तरदायित्वाची मागणी करतो, त्याचप्रमाणे आमच्या पक्षातही उत्तरदायित्व असले पाहिजे," असे त्यांनी म्हटले. तसेच, आम्ही अभिजीत दिपके यांचे वैयक्तिक विरोधक नसून पक्षात सध्या सुरू असलेल्या कार्यपद्धतीचा विरोध करत असल्याचेही या आंदोलकांनी स्पष्ट केले. बैठकीनंतर उफाळलेल्या या वादामुळे सीजेपीमधील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर आल्याची चर्चा सुरू झाली आहे.