अतीक अहमदच्या धाकट्या मुलाचा अपघाती मृत्यू

    दिनांक :06-Aug-2026
Total Views |
झाशी,
Death of Atiq Ahmed's son उत्तर प्रदेशातील झाशी येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात माफिया नेता अतीक अहमद यांचा धाकटा मुलगा अबान अहमद याचा मृत्यू झाला. झाशी-कानपूर महामार्गावर भरधाव वेगाने धावणारी त्याची कार अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन डिव्हायडरवर आदळल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेत अबानसोबत प्रवास करणारा त्याचा मित्र सोनू याचाही मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी अबान प्रयागराजहून झाशीला आपल्या मोठ्या भाऊ अलीला तुरुंगात भेटण्यासाठी जात होता.ही घटना झाशीतील पूंछ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. प्राथमिक माहितीनुसार, महामार्गावर अचानक एक प्राणी समोर आल्याने चालकाने तो वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वाहनावरील नियंत्रण सुटले आणि क्रेटा कार जोरात डिव्हायडरवर आदळली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.
 
 

ahamad 
 
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी २१ वर्षीय अबान अहमद आणि त्याचा मित्र सोनू यांना मृत घोषित केले. या अपघातात उमर अहमद, मोहम्मद झैद आणि अस्लम हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारानंतर महाराणी लक्ष्मी बाई वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.अतीक अहमदच्या कुटुंबावर यापूर्वीही अनेक मोठे आघात झाले आहेत. उमेश पाल हत्या प्रकरणात झालेल्या पोलिसांच्या चकमकीत त्याचा मुलगा असद ठार झाला होता. सध्या अतीकचा मुलगा अली झाशी कारागृहात असून त्याच्याविरोधात १० गुन्ह्यांची नोंद आहे. दुसरा मुलगा उमर लखनौच्या तुरुंगात असून त्याच्यावर ११ गुन्हे दाखल आहेत. आयझम हा मुलगा सध्या तुरुंगाबाहेर राहून शिक्षण घेत आहे. धाकटा मुलगा अबान हा देखील बाहेर होता, मात्र या भीषण रस्ते अपघातात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, अतीक अहमदची पत्नी शाइस्ता परवीन अद्याप फरार असून तिच्या अटकेसाठी ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.