दिल्ली वार्तापत्र - श्यामकांत जहागीरदार
assembly by election results बिहार, गुजरात आणि मध्यप्रदेशातील विधानसभेच्या तीन जागांसाठी झालेल्या पाेटनिवडणुकीच्या निकालाची सध्या चर्चा आहे. बिहारमधील बांकीपूर येथे भाजपाचा पराभव झाला. मध्यप्रदेशातील दतिया येथे काँग्रेस जिंकली तर गुजरातमध्ये भाजपाने विजय मिळविला, असा या निवडणुकीचा निकाल आहे. तीन मतदारसंघातील पाेटनिवडणुकीत भाजपाला दाेन जागा गमवाव्या लागल्या, फक्त एक जागा जिंकता आली. क्रिकेटच्या भाषेत सांगायचे तर दाेन एकने भाजपाने ही मालिका गमावली. दाेन राज्यातील भाजपाच्या पराभवाचा त्या राज्यातील भाजपाला धक्का बसला असला, तरी त्याचा त्या राज्यातील भाजपा सरकारच्या स्थैर्यावर मात्र काेणताही परिणाम हाेणार नाही, तरीही या निवडणुकीतील विशेषत: बांकीपूर मतदारसंघातील भाजपाच्या पराभवाची चर्चा हाेणार आहे.

गुजरातमधील मंजालपूरची जागा भाजपाची हाेती; ती भाजपाने कायम राखली. मध्यप्रदेशातील दतियाची जागा काँग्रेसची हाेती; ती काँग्रेसने पुन्हा जिंकली. फक्त बिहारच्या बांकीपूरची जागा भाजपाला गमवावी लागली. सामान्यपणे काेणत्याही राज्यात हाेणाऱ्या पाेटनिवडणुकीत सत्ताधारी पक्ष जिंकत असताे. बिहार आणि मध्यप्रदेेशात भाजपाची सत्ता आहे, त्यामुळे या राज्यातील दाेन्ही पाेटनिवडणुका भाजपाने जिंकणे अपेक्षित हाेते. मात्र, या दाेन्ही ठिकाणी भाजपाचा पराभव झाला. त्यामुळे भाजपाला या दाेन्ही पराभवाचे चिंतन आणि मंथन करावे लागणार आहे. विशेष म्हणजे बिहारमध्ये आतापर्यंत भाजपा सत्तेत असला, तरी मुख्यमंत्रिपद जदयुकडे म्हणजे नितीशकुमार यांच्याकडे हाेते. यावेळी प्रथमच मुख्यमंत्रिपद भाजपाला मिळाले आणि सम्राट चाैधरी मुख्यमंत्री झाले. तरीही बांकीपूर मतदारसंघातील प्रतिष्ठेच्या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला. त्यामुळे मुख्यमंत्री सम्राट चाैधरी यांनाही याचे आत्मपरीक्षण करावे लागणार आहे.
भाजपा काेणतीही निवडणूक पूर्ण गांभीर्याने आणि तयारीने लढवत असताे. निवडणूक लढवताना काेणताही हलगर्जीपणा करत नाही; मात्र बाकीपूरची पाेटनिवडणूक लढवताना काेणत्या तरी टप्प्यावर भाजपाकडून गफलत झाली, असे निवडणूक निकालावरून म्हणावेसे वाटते. राष्ट्रीय अध्यक्षाचा हा मतदारसंघ असल्यामुळे या मतदारसंघात भाजपाकडून अधिक खबरदारी घेणे अपेक्षित हाेते. याठिकाणी एकतर भाजपाला अतिआत्मविश्वास नडला वा भाजपाने ही निवडणूक पूर्ण गांभीर्याने लढली नाही, असे म्हणायला जागा आहे. बिहारच्या बांकीपूरचा भाजपाचा पराभव हा अनपेक्षित आणि धक्कादायक म्हणावा लागेल. भाजपाचा बालेकिल्ला म्हणून हा मतदारसंघ ओळखला जात हाेता. नितीन नवीन यांचे वडील नवीन किशाेर सिन्हा या मतदारसंघातून सलग चार वेळा जिंकले, तर नितीन नवीन पाच वेळा या मतदारसंघातून विजयी झाले आहे. १९९५ पासून हा मतदारसंघ भाजपाकडे हाेता. यावरून या मतदारसंघातील भाजपाच्या पराभवाचे गांभीर्य लक्षात येईल.
मंजालपूरमध्ये भाजपाचे विद्यमान आमदार याेगेश पटेल यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाल्यामुळे या मतदारसंघात पाेटनिवडणूक घ्यावी लागली. या मतदारसंघात भाजपाचे सतीशभाई पटेल विजयी झाले. २०१२ पासून हा मतदारसंघ भाजपकडे हाेता. पाेटनिवडणुकीत भाजपाने ताे आपल्याकडे कायम राखला. मध्यप्रदेशातील दतियाची पाेटनिवडणूक काँग्रेस आमदार राजेंद्र भारती यांना अपात्र ठरवल्यामुळे घ्यावी लागली. फसवणुकीच्या प्रकरणात त्यांना तीन वर्षाची शिक्षा झाल्यामुळे त्यांना आपली आमदारकी गमवावी लागली.
काँग्रेसने दतिया राजघराण्यातील कुंवर घनश्यामसिंह यांना उमेदवारी दिली तर भाजपाने आशुताेष तिवारी यांना, या मतदारसंघातील निवडणूक भाजपाच्या उमेदवारीमुळे गाजली हाेती. माजी गृहमंत्री नराेत्तम मिश्रा यांचा हा मतदारसंघ. मागील निवडणुकीत मिश्रा यांचा पराभव झाला, यावेळी उमेदवारीसाठी नराेत्तम मिश्रा इच्छुक हाेते, पण भाजपाने त्यांना उमेदवारी न देता आशुताेष तिवारी यांना उमेदवारी दिली. त्यामुळे मिश्रा यांचे समर्थक संतापले आणि त्यांनी आक्रमक पद्धतीने आपला निषेध व्यक्त केला. महामार्ग राेखला, त्यामुळे संतप्त भाजपा कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पाेलिसांना बळाचा वापर करावा लागला. त्यामुळे या मतदारसंघातील पाेटनिवडणूक चर्चेत आली आणि भाजपासाठी प्रतिष्ठेची झाली हाेती, पण या ठिकाणी भाजपाचा पराभव झाला.
याचाच अर्थ भाजपाच्या प्रदेश नेतृत्वाने आशुताेष तिवारी यांची या मतदारसंघावर थाेपलेली उमेदवारी भाजपा कार्यकर्त्यांना मान्य नव्हती, त्यामुळे भाजपाला पराभवाचे ताेंड पाहावे लागले. या पराभवाचे खापर मुख्यमंत्री माेहन यादव यांच्यावर फुटू शकते तसेच त्यांच्या नेतृत्वक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकते. काेणत्याही निवडणुकीत वा पाेटनिवडणुकीत पक्षाचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असते. या जबाबदारीत बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चाैधरी आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री माेहन यादव कमी पडले, हे निश्चित.
दतियापेक्षाही बांकीपूर विधानसभा मतदारसंघातील पराभव भाजपासाठी धक्कादायक म्हणावा लागेल. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाचा विधानसभा मतदारसंघ भाजपाला कायम राखता आला नाही, असा याचा अर्थ निघताे. बांकीपूरमध्ये भाजपा सुरुवातीपासूनच गाेंधळलेला हाेता, असे म्हणावे लागेल. उमेदवार निवडण्यापासूनच त्याने घाेळ घातला, आधी अभिषेककुमार यांना उमेदवारी दिली; त्यांनी उमेदवारी अर्ज भरलाही, पण नंतर त्यांना अचानक माघार घ्यायला लावत भाजपाने नीरजकुमार यांना उमेदवारी दिली. बांकीपूरमध्ये जनसुराज्य पक्षाचे प्रशांत किशाेर विजयी झाले. निवडणूक व्यवस्थापन तज्ज्ञ अशी प्रशांत किशाेर यांची ओळख आहे. आतापर्यंत राजकीय पक्षाच्या नेत्यांना आणि त्यांच्या पक्षाला निवडणूक जिंकून देण्याचा ठेका घेणाऱ्या म्हणजे किंगमेकर असणाऱ्या प्रशांत किशाेर यांना किंग हाेण्याची स्वप्न पडू लागली आणि त्यांनी जनसुराज्य पक्षाची स्थापना केली. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनसुराज्य पक्षाचा धुव्वा उडाला. एकही जागा त्याला जिंकता आली नाही. एवढेच काय, त्यांच्या जवळपास सर्व उमेदवारांची जमानत जप्त झाली. त्यावेळी विधानसभा निवडणूक न लढवणाऱ्या प्रशांत किशाेर यांना नितीन नवीन यांच्या राजीनाम्यामुळे झालेल्या पाेटनिवडणुकीतून आपले राजकीय नेतृत्व प्रस्थापित करण्याची चांगली संधी मिळाली, असे म्हणावे लागते.
प्रशांत किशाेर यांच्या विजयाचा भाजपाला बसलेला फटका हा तात्कालिक स्वरूपाचा म्हणावा लागेल. पण बिहारच्या राजकारणात प्रशांत किशाेर यांच्या झालेल्या उदयाचा खरा फटका राष्ट्रीय जनता दलाला दीर्घ काळासाठी बसणार आहे. बिहारच्या राजकारणातील त्या पक्षाचा प्रभाव कमी हाेणार आहे. बांकीपूर पाेटनिवडणुकीत राजदच्या रेखा गुप्ता तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या. बांकीपूरमध्ये आपला पराभव हाेणार, याची कल्पना राजदचे तेजस्वी यादव यांना आधीच आली असावी, त्यामुळे निवडणूक प्रचारारादरम्यान पक्षाला वाऱ्यावर साेडत तेजस्वी यादव परदेशात निघून गेले. बिहारच्या राजकारणात प्रशांत किशाेर यांच्या पक्षाचा प्रभाव जेवढा वाढेल, तेवढा राजदचा प्रभाव कमी हाेणार आहे. बांकीपूरमध्ये राजद उमेदवार जसा तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला, तसाच राज्याच्या राजकारणात राजद तिसऱ्या वा चाैथ्या स्थानावर फेकला गेला तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. त्यामुळे भाजपाच्या पराभवामुळे राजदने जास्त उड्या मारण्याची गरज नाही तसेच भाजपाने हताश हाेण्याचेही कारण नाही. राजदने स्वत:च्या पराभवाचे आत्मचिंतन केले पाहिजे.
९८८१७१७८१७