आयर्लंडचे थेट प्रवेशाचे स्वप्न भंगले!

    दिनांक :06-Aug-2026
Total Views |

डब्लिन,
irelands dream shattered २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी थेट पात्रता मिळवण्याच्या शर्यतीत आयर्लंडला मोठा धक्का बसला आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने आयर्लंडच्या थेट प्रवेशाच्या सर्व आशा संपुष्टात आल्या आहेत. या सामन्यात नाणेफेकही होऊ शकली नाही. मालिकेत अजून चार सामने शिल्लक असले तरी आता ते सर्व जिंकूनही आयर्लंडला थेट पात्रता मिळवता येणार नाही.
 
irelands dream shattered
 
आयर्लंडसमोर थेट विश्वचषक प्रवेशासाठी एकमेव मार्ग म्हणजे अफगाणिस्तानला पाच सामन्यांच्या मालिकेत ५-० अशी धूळ चारणे होता. त्याचबरोबर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजचा पराभव होणेही आवश्यक होते. या दोन्ही घडामोडींमुळे आयर्लंडचे आयसीसी क्रमवारीतील स्थान सुधारून त्यांना थेट विश्वचषकाचे तिकीट मिळण्याची शक्यता होती. मात्र पहिलाच सामना पावसामुळे रद्द झाल्याने हा मार्ग कायमचा बंद झाला.
 
आता आयर्लंडला २०२७ विश्वचषकासाठी पात्रता फेरीचा मार्ग स्वीकारावा लागणार आहे. या पात्रता स्पर्धेत जगभरातील १० संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेच्या स्वरूपानुसार गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवणारा संघ थेट विश्वचषकासाठी पात्र ठरेल. तर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघांना 'सुपर सिरीज' खेळावी लागेल. या सुपर सिरीजमधील अव्वल संघालाच विश्वचषकाचे दुसरे तिकीट मिळेल, तर उर्वरित दोन संघांचे आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे पात्रता फेरीतून विश्वचषक गाठणे यावेळी अधिक कठीण ठरणार आहे.
 
विशेष म्हणजे, आयर्लंडला २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकातही स्थान मिळवता आले नव्हते. त्यावेळी संघ सुपर सिक्स फेरीतून बाहेर पडला होता. आता २०२७ विश्वचषकासाठीही थेट प्रवेशाची संधी हुकल्याने आयर्लंडसमोर पुन्हा एकदा कठीण आणि आव्हानात्मक पात्रता फेरी पार करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.