बुमराहला एक वर्ष क्रिकेटपासून दूर ठेवा

माजी गोलंदाजाचा मोठा सल्ला

    दिनांक :06-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Keep Bumrah away from cricket भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा दुखापतीमुळे चर्चेत आला आहे. सध्या तो गुडघ्याच्या दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचे माजी वेगवान गोलंदाज करसन घरावी यांनी बुमराहच्या फिटनेसबाबत मोठे वक्तव्य करत त्याला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी पाच ते सहा महिने, गरज पडल्यास तब्बल एक वर्ष क्रिकेटपासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला आहे.बुमराहच्या गोलंदाजीची शैली शरीरावर मोठा ताण आणणारी असल्याने त्याला यापूर्वीही पाठीच्या दुखापतींना सामोरे जावे लागले आहे. अनेक महत्त्वाच्या स्पर्धांनाही तो मुकला आहे. पुढील वर्षी होणारा एकदिवसीय विश्वचषक आणि त्याआधीचे महत्त्वाचे कसोटी सामने लक्षात घेता त्याची तंदुरुस्ती भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. अशा परिस्थितीत वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे भारतीय वेगवान गोलंदाजीवरही परिणाम होऊ शकतो.
 
 
g79890
 
वृत्तानुसार, करसन घरावी यांनी बुमराहबाबत स्पष्ट भूमिका मांडली. त्यांच्या मते, "बुमराहने १०० टक्के तंदुरुस्ती मिळवण्यासाठी पाच ते सहा महिने किंवा गरज भासल्यास वर्षभर विश्रांती घ्यावी. तो पूर्णपणे फिट नसतानाही खेळतो, त्यामुळे त्याच्या कामाच्या व्यवस्थापनावर परिणाम होतो आणि दुखापतींचा धोका वाढतो.घरावी यांनी पुढे सांगितले की, बुमराहला केवळ नावासाठी संघात स्थान देण्याची गरज नाही. तो पूर्ण क्षमतेने खेळू शकत असेल आणि त्याच्या कामाचे योग्य नियोजन शक्य असेल, तेव्हाच त्याची संघात निवड केली पाहिजे.
 
 
यावेळी त्यांनी अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांच्या पुनरागमनाचीही जोरदार बाजू मांडली. आयपीएलमध्ये हे दोन्ही गोलंदाज सातत्याने खेळत असून दुखापतीशिवाय प्रभावी गोलंदाजी करत आहेत. त्यामुळे निवड समितीने त्यांना पुन्हा भारतीय संघात संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. मोहम्मद शमी २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय संघात खेळलेला नाही, तर भुवनेश्वर कुमारने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना २०२२ मध्ये खेळला होता. मात्र, अलीकडेच भुवनेश्वर कुमारने भारतीय संघात पुनरागमन करणे हे सध्या आपले सर्वोच्च ध्येय नसल्याचे स्पष्ट केले होते. तो केवळ क्रिकेटवरील प्रेमापोटी आयपीएल आणि देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळत असल्याचे त्याने म्हटले होते.