तेहरान
Meeting between Mojtaba Khamenei and Pezeshkian इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांच्याशी संवाद साधणे सध्या "अत्यंत कठीण" असल्याचे म्हटले आहे. मात्र, देशावर आलेल्या संकटाच्या काळात खामेनी यांचे नेतृत्व आणि मार्गदर्शन इराणसाठी मोठा आधार ठरत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यम IRIB ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सर्वोच्च नेतृत्वाशी झालेल्या भेटीविषयी आणि देशातील सध्याच्या परिस्थितीविषयी भाष्य केले. पेझेशकियान यांनी सांगितले की, अलीकडेच त्यांची मोजतबा खामेनी यांच्यासोबत प्रत्यक्ष भेट झाली. इराण इंटरनॅशनलने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, ही भेट तेहरानमधील एका गुप्त ठिकाणी झाली. राष्ट्राध्यक्षांना तेथे गडद रंगाच्या काचा असलेल्या वाहनातून नेण्यात आले आणि वाहनाच्या मागील सीटवर बसलेल्या मोजतबा खामेनी यांच्याशी काही मिनिटे चर्चा झाली. या बैठकीत खामेनी यांनी अत्यंत शांत आणि सौजन्यपूर्ण भूमिका घेतली तसेच मांडलेले मुद्दे प्रभावी आणि पटणारे होते, असे पेझेशकियान यांनी सांगितले.

राष्ट्राध्यक्षांनी असा आरोपही केला की, काही गट जाणीवपूर्वक त्यांची आणि सर्वोच्च नेतृत्वाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असून समाजात मतभेद निर्माण करण्याचे काम करत आहेत. त्यांनी एका अलीकडील निर्णय प्रक्रियेचे उदाहरण देताना सांगितले की, एका ठरावाला १३ पैकी १२ सदस्यांनी पाठिंबा दिल्यानंतर मोजतबा खामेनी यांनी परिषदेचा निर्णय स्वीकारला. "त्यांनी घेतलेली भूमिका पूर्णपणे योग्य होती," असे पेझेशकियान यांनी नमूद केले. मात्र, या निर्णयाचा नंतर काहींनी चुकीचा अर्थ लावत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला.दरम्यान, २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर मोजतबा खामेनी यांनी इराणच्या सर्वोच्च नेतेपदाची जबाबदारी स्वीकारली. या हल्ल्यानंतर पश्चिम आशियातील तणाव अधिक तीव्र झाला. सध्या मोजतबा खामेनी जखमी असल्याचे सांगितले जात असून ते सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर आहेत. त्यांनी वेळोवेळी लेखी निवेदने जारी केली असली तरी सार्वजनिकरित्या ते अद्याप दिसलेले नाहीत. गेल्या महिन्यात वडिलांच्या अंत्यसंस्कारालाही ते उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत आणि इराणच्या वरिष्ठ नेतृत्वाशी असलेल्या समन्वयाबाबत विविध चर्चा सुरू आहेत.