पप्पू यादवांच्या मुलाचा डीपीएलमध्ये धडाका!

    दिनांक :06-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
pappu yadavs son दिल्ली प्रीमियर लीग (डीपीएल)मध्ये बिहारचे खासदार पप्पू यादव यांचा मुलगा सार्थक रंजन याने दमदार फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नॉर्थ दिल्ली स्ट्रायकर्सचा कर्णधार असलेल्या सार्थकने ईस्ट दिल्ली रायडर्सविरुद्धच्या सामन्यात अवघ्या ५० चेंडूंमध्ये ९५ धावांची तुफानी खेळी साकारली. या खेळीत त्याने ८ षटकार आणि ७ चौकारांची आतषबाजी करत १९० च्या स्ट्राइक रेटने धावा फटकावल्या. मात्र, शतकापासून केवळ ५ धावा दूर असताना त्याची खेळी संपुष्टात आली.
 
pappu yadavs son
 
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ईस्ट दिल्ली रायडर्सने ६ गडी गमावत १७१ धावांची मजल मारली. संघाकडून सुजल सिंगने ५० चेंडूंमध्ये ८२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. प्रत्युत्तरात नॉर्थ दिल्ली स्ट्रायकर्सने आक्रमक सुरुवात करत लक्ष्याचा पाठलाग केला. सार्थक रंजनच्या ९५ धावांबरोबरच यश भाटियाने नाबाद ५३ धावांचे योगदान दिल्यामुळे संघाने १६ षटकांत केवळ ४ गडी गमावून १७२ धावांचे लक्ष्य पार केले आणि ६ गडी राखून शानदार विजय मिळवला. डीपीएलच्या चालू हंगामातील हा सार्थक रंजनचा पहिलाच सामना होता. यापूर्वी त्याने जानेवारी महिन्यात विजय हजारे ट्रॉफीमध्येही सहभाग नोंदवला होता.
 
सार्थक रंजन याला याआधी इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाने ३० लाख रुपयांच्या मूळ किमतीत आपल्या ताफ्यात घेतले होते. मात्र, संपूर्ण हंगामात त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. दिल्लीकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या सार्थकने २०१६ मध्ये टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले असून, सध्या तो नॉर्थ दिल्ली स्ट्रायकर्सचे नेतृत्वही करत आहे.