राष्ट्रवादीच्या रणनीतीसाठी प्रशांत किशोर मैदानात?

सुनेत्रा-पार्थ पवारांसोबत "देवगिरी"वर खलबत्ते

    दिनांक :06-Aug-2026
Total Views |
मुंबई,
Prashant Kishor for NCP's strategy राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची मुंबईतील 'देवगिरी' या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या तिघांमध्ये बंदद्वार बैठक पार पडल्याने पक्षाच्या आगामी राजकीय रणनीतीबाबत नव्या चर्चांना वेग आला आहे. 'डिझाईन बॉक्स' कंपनीशी करार संपुष्टात आल्यानंतर पक्षाची प्रतिमा उंचावणे आणि आगामी निवडणुकांसाठी नवी रणनीती आखण्याची जबाबदारी प्रशांत किशोर यांच्याकडे सोपवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
 
 

s35 
सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका, राज्यभर जनमत चाचण्या, पक्षसंघटना मजबूत करण्याचे नियोजन तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील राजकीय वाटचालीवर सविस्तर चर्चा झाली. नुकताच पार पडलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापनदिन कार्यक्रमही प्रशांत किशोर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी मे २०२६ मध्येही त्यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी पार्थ पवार यांनी सोशल मीडियावर भेटीचे छायाचित्र शेअर केले होते, मात्र राजकीय सल्लागार म्हणून प्रशांत किशोर यांची नियुक्ती झाल्याच्या चर्चेचे खंडन केले होते.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष संघटनेतील नियुक्त्यांवरून अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेली अध्यक्षपदाची निवड पक्षघटनेनुसार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. दुसरीकडे, प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी सुनेत्रा पवार यांचा संवाद कमी झाल्याचीही चर्चा सुरू आहे. निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या पत्रात प्रफुल पटेल यांच्या 'कार्याध्यक्ष' आणि सुनील तटकरे यांच्या 'प्रदेशाध्यक्ष' पदांचा उल्लेख टाळण्यात आल्याने दोन्ही नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटना मजबूत करणे, जनाधार वाढवणे आणि आगामी निवडणुकांसाठी प्रभावी रणनीती तयार करण्यासाठी प्रशांत किशोर यांच्या अनुभवाचा उपयोग करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.