'रामायण'ला ऑस्कर न मिळाल्यास ज्युरीच निराश होईल; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा विश्वास

    दिनांक :06-Aug-2026
Total Views |
मुंबई,
ramayan दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित 'रामायण' चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफी, व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX) आणि भव्य सादरीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चित्रपटाचे कौतुक करत मोठे विधान केले. 'रामायण'ला भविष्यात ऑस्कर पुरस्कार मिळाला नाही, तर ज्युरीलाच त्याचे दुःख वाटेल, असे ते म्हणाले.
 

रामायण  
 
 
गोरेगाव येथील फिल्म सिटीमध्ये आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी दादासाहेब फाळके यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. तसेच 'आईच्या नावाने एक झाड' या अभियानांतर्गत वृक्षारोपण केले. याच कार्यक्रमात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या 'प्राइम फोकस स्टुडिओ'च्या नव्या सुविधेचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना फडणवीस यांनी प्राइम फोकस स्टुडिओच्या उभारणीमागील प्रयत्नांचा उल्लेख केला. ही सुविधा उभारण्यासाठी अनेक प्रशासकीय अडचणी होत्या, मात्र राज्य सरकारने पुढाकार घेत त्या दूर केल्या. कमी कालावधीत हा प्रकल्प साकारण्यात आला असून, हे स्टुडिओ जागतिक दर्जाच्या सर्जनशीलतेचे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या 'ऑरेंज इकॉनॉमी'च्या संकल्पनेचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले की, सर्जनशील उद्योग, तंत्रज्ञान आणि संस्कृती यांच्या माध्यमातून भारताला नवे आर्थिक बळ मिळू शकते. महाराष्ट्र सरकारही त्याच दिशेने काम करत असून, चित्रपटसृष्टीसाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात आहे.
'रामायण' चित्रपटाचा विशेष उल्लेख करत त्यांनी सांगितले की, या चित्रपटाने ट्रेलर प्रदर्शित होताच जगभरात अभूतपूर्व प्रतिसाद मिळवला आहे. आधुनिक तंत्रज्ञान, भव्य निर्मिती आणि उच्च दर्जाच्या सादरीकरणामुळे हा चित्रपट जागतिक स्तरावर वेगळी ओळख निर्माण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. "या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाला नाही, तर ज्युरीलाच निराश व्हावे लागेल," असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.
मुंबईची चित्रपटसृष्टी देशातील सर्वात मोठी आणि सक्षम परिसंस्था असल्याचे सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, मुंबईची फिल्म सिटी दुसऱ्या राज्यात हलविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.ramayan जशी दुसरी मुंबई निर्माण होऊ शकत नाही, तशीच येथे विकसित झालेली चित्रपटसृष्टीची परिसंस्था इतरत्र उभी राहणेही कठीण असल्याचे त्यांनी नमूद केले.
फिल्म सिटीच्या पुनर्विकासाचा आराखडा तयार करण्यात आला असून, जागतिक दर्जाचे स्टुडिओ, आधुनिक व्हर्च्युअल प्रॉडक्शन सुविधा आणि अत्याधुनिक चित्रपटनिर्मिती तंत्रज्ञान येथे उपलब्ध करून दिले जाणार आहे. सुमारे ३ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून या क्षेत्राचा विकास करण्याचा सरकारचा मानस असून, मुंबईला जगातील आघाडीचे चित्रपटनिर्मिती केंद्र बनविण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.