केंद्रपडा,
sending a message to a girl on instagram ओडिशातील केंद्रपडा जिल्ह्यात इन्स्टाग्रामवर एका विद्यार्थिनीला मेसेज पाठवल्याच्या कारणावरून महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर कथितपणे हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मुलीच्या प्रियकराने आणि त्याच्या काही मित्रांनी संबंधित विद्यार्थ्याला अडवून मारहाण केल्याचा आरोप असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ही घटना राजनगर परिसरात घडली असून, पीडित विद्यार्थी मदनपूर महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याची माहिती आहे.

घटनेनंतर विद्यार्थ्याच्या आईने पट्टामुंडाई ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, गोविंदपूर येथे आपल्या मामाकडे राहणारा तिचा मुलगा महाविद्यालयातून परतलाच नाही. काही वेळानंतर त्याच गावातील एका तरुणाने विद्यार्थ्याला काही जण मारहाण करत असल्याचा व्हिडिओ कुटुंबीयांना पाठवला. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. तक्रारीनंतर पोलिसांनी अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. व्हायरल व्हिडिओतील तरुणांची ओळख पटवून आतापर्यंत तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
पट्टामुंडाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्रीकांत कुमार बारीक यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात हे प्रकरण प्रेमसंबंधातून उद्भवल्याचे दिसत आहे. राजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरुंडी गावातील पट्टामुंडाई महाविद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचे त्याच महाविद्यालयातील विद्यार्थिनीसोबत प्रेमसंबंध होते. पीडित विद्यार्थ्याने त्या विद्यार्थिनीला इन्स्टाग्रामवर संदेश पाठवला होता. याच कारणावरून संतप्त झालेल्या प्रियकराने आपल्या मित्रांसह त्याच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. व्हिडिओमध्ये दिसणारे बहुतांश तरुण हे महाविद्यालयीन विद्यार्थी असून त्यांच्यापैकी अनेक जण अल्पवयीन असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.
दरम्यान, हल्ल्यातील पीडित विद्यार्थी अद्याप सापडलेला नसून तो भीतीपोटी कुठेतरी लपल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्याचा शोध सुरू असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. सर्व संबंधितांचे जबाब नोंदवले जात असून तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. अल्पवयीन असल्यामुळे ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांची तसेच पीडिताची ओळख पोलिसांनी जाहीर केलेली नाही.