कोलंबो,
sri lanka squad announced for practice matches भारत आणि श्रीलंका यांच्यात १५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी दोन्ही संघ तयारीला अंतिम रूप देत आहेत. या मालिकेपूर्वी भारतीय संघ ७ ऑगस्टपासून कोलंबोतील एनसीसी मैदानावर श्रीलंका क्रिकेट (एसएलसी) इलेव्हनविरुद्ध तीन दिवसीय सराव सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी श्रीलंका क्रिकेटने १५ सदस्यीय एसएलसी इलेव्हन संघाची घोषणा केली असून, २५ वर्षीय अष्टपैलू सोनल दिनुशा याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे.

एसएलसी इलेव्हनमध्ये अशा अनेक खेळाडूंना संधी देण्यात आली आहे, जे आगामी कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेच्या अंतिम संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीत आहेत. संघात अनुभवी वेगवान गोलंदाज लाहिरू कुमारा आणि विश्वा फर्नांडो, फिरकीपटू रमेश मेंडिस, फलंदाज निशान मदुष्का आणि पवन रत्नायके, तसेच यष्टिरक्षक अंजला बंडारा यांचा समावेश आहे. डावखुरा फिरकीपटू दिलुम सुदिरा आणि वेगवान गोलंदाज केसरा नुवंथा यांच्यावरही विशेष लक्ष असेल. दिलुम सुदिराने यापूर्वी भारत 'अ' संघाविरुद्ध १० बळी घेत प्रभावी कामगिरी केली होती.
सोनल दिनुशासाठी हा सामना स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची मोठी संधी मानला जात आहे. गेल्या वर्षी बांगलादेशविरुद्ध कसोटी पदार्पण केलेल्या दिनुशाने आतापर्यंत तीन कसोटी सामने खेळले आहेत. श्रीलंकेचे अनेक नियमित खेळाडू सध्या लंका प्रीमियर लीगमध्ये व्यस्त असल्याने या सराव सामन्यातील कामगिरीच्या आधारे कसोटी मालिकेसाठी अंतिम संघाची निवड होण्याची शक्यता आहे.
भारतीय संघासाठीही हा सराव सामना तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघाला श्रीलंकेतील फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांशी जुळवून घेण्याची ही उत्तम संधी असेल. अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा आयपीएल २०२६ नंतर प्रथमच स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो. तसेच प्रथमच कसोटी संघात स्थान मिळवलेल्या सरांश जैन आणि आकिब नबी यांनाही आपल्या कामगिरीची छाप पाडण्याची संधी मिळण्याची अपेक्षा आहे. १५ ऑगस्टपासून गाले येथे सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीपूर्वी हा सराव सामना दोन्ही संघांसाठी संयोजन आणि रणनीती निश्चित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.
एसएलसी इलेव्हन : निशान मदुष्का, रविंदू रशांता, पसिंदू सूरियाबंदारा, पवन रत्नायके, अहान विक्रमसिंघे, सोनल दिनुशा (कर्णधार), अंजला बंडारा (यष्टिरक्षक), निपुण धनंजया, लाहिरू कुमारा, विश्वा फर्नांडो, असांका मनेश, इशांका मनेश, विक्रम केसरा नुवंथा, दिलुम सुदिरा आणि रमेश मेंडिस.