लाखांदूर,
lakhandur news शेजारील एका विवाहित महिलेवर जादूटोणा केल्याच्या संशयावरून एका वृद्धावर प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना ३० जुलै रोजी लाखांदूर तालुक्यातील मासल येथे घडली होती. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा नागपूर येथील मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचारादरम्यान ६ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. या प्रकरणी लाखांदूर पोलिसांनी आधीच अटक केलेल्या चार आरोपींविरुद्ध आता खुनाचा (कलम ३०२) गुन्हा दाखल केला आहे.
मासल येथील रहिवासी बळराम लांजेवार (वय ६५) यांच्यावर शेजारी राहणाऱ्या एका विवाहितेवर जादूटोणा केल्याचा संशय आरोपींनी घेतला होता. या कारणावरून संतापलेल्या ४ जणांनी ३० जुलै रोजी बळराम लांजेवार यांच्यावर बेदम मारहाण करत प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते.
घटनेची माहिती मिळताच लाखांदूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गंद्रे, पोलीस उपनिरीक्षक निशांत जुनोनकर व पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी वृद्धाला तात्काळ लाखांदूर व भंडारा येथील रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूर येथील मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
उपचारादरम्यान अखेरचा श्वास
गेल्या आठवडाभरापासून नागपूर येथे मृत्यूशी झुंज देणाऱ्या बळराम लांजेवार यांची ६ ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.घटनेनंतर पीडित वृद्धाच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चारही आरोपींना तत्काळ अटक केली होती. आरोपींना ५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.lakhandur news कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना कारागृहात (जेल) रवाना करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गोपाळ लांजेवार (वय ४५ वर्ष),विवेक लांजेवार(वय २५ वर्ष),प्रमोद लांजेवार (वय ४० वर्ष),किशोर लांजेवार(वय ४० वर्ष) (सर्व रा. मासल) वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने पोलिसांनी आरोपींविरुद्धच्या गुन्ह्यात वाढ करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लाखांदूर पोलीस करत आहेत.