तरुण तेजपाल दोषी; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

    दिनांक :06-Aug-2026
Total Views |
मुंबई,
Tarun Tejpal news 'तेहलका' या वृत्त मासिकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना बलात्कार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्दोष मुक्ततेचा निकाल रद्द करत त्यांना दोषी ठरवले. न्यायमूर्ती नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित जामसांदेकर यांच्या खंडपीठाने दोषसिद्धीचा निर्णय जाहीर केला असून शिक्षेबाबतचा आदेश दुपारी सुनावण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.निर्णयावेळी न्यायालयात उपस्थित असलेल्या तरुण तेजपाल यांनी न्यायालयाकडे सौम्य शिक्षेची विनंती केली. तसेच या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे त्यांनी सांगितले. पीटीआयच्या वृत्तानुसार, न्यायालयासमोर बाजू मांडताना त्यांनी, "मी ६२ वर्षांचा आहे. मला दोन मुली आहेत, पत्नी आहे आणि मी राजकीय कटाचा बळी ठरलो आहे," असे म्हटले.
 
 
 
tejpal
 
तेजपाल यांचे वकील आबाद पोंडा यांनी न्यायालयाकडे किमान शिक्षा देण्याची मागणी केली. तसेच दोषसिद्धी आणि शिक्षेच्या अंमलबजावणीला किमान १० आठवड्यांची स्थगिती द्यावी, जेणेकरून सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करता येईल, अशी विनंतीही त्यांनी केली.दुसरीकडे, गोवा सरकारची बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाकडे कमाल शिक्षेची मागणी केली. अशा गुन्ह्यांमध्ये कठोर शिक्षा झाल्यास 'नाही म्हणजे नाही' हा स्पष्ट संदेश समाजात जाईल, असा युक्तिवाद त्यांनी केला. मुंबई उच्च न्यायालयाने तरुण तेजपाल यांना भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६(२)(फ), ३५४(अ) आणि ३५४(ब) अंतर्गत दोषी ठरवले आहे. यामध्ये विश्वासाच्या किंवा अधिकाराच्या स्थानावर असलेल्या व्यक्तीकडून महिलेवर बलात्कार, लैंगिक छळ आणि महिलेचे वस्त्र काढण्याच्या उद्देशाने गुन्हेगारी बळाचा वापर या आरोपांचा समावेश आहे. कलम ३७६(२)(फ) अंतर्गत किमान १० वर्षांपासून जन्मठेपेपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. हे प्रकरण नोव्हेंबर २०१३ मध्ये गोव्यात झालेल्या 'थिंकफेस्ट' कार्यक्रमादरम्यान घडलेल्या कथित लैंगिक अत्याचाराशी संबंधित आहे. कार्यक्रमाच्या वेळी हॉटेलच्या लिफ्टमध्ये एका माजी कनिष्ठ महिला सहकाऱ्यावर लैंगिक अत्याचार आणि बलात्कार केल्याचा आरोप तरुण तेजपाल यांच्यावर करण्यात आला होता. २०२१ मध्ये कनिष्ठ न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, त्या निर्णयाविरोधात गोवा सरकारने मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते आणि आता उच्च न्यायालयाने तो निकाल रद्द करत तेजपाल यांना दोषी ठरवले आहे.