जेरबंद होताच बिबट जीवास मुकला

नवेगावात भरदिवसा मांडले होते अंगणात ठाण

    दिनांक :06-Aug-2026
Total Views |
चंद्रपूर,
tleopard died तालुक्यातील खडसंगी जवळील नवीन नवेगाव पुनर्वसन येथील गावाशेवटी असलेल्या तुकाराम शेंडे यांच्या घरच्या अंगणातील गुरांच्या गोठ्याजवळ बिबट्या बुधवारपासून ठाण मांडून बसला होता. गुरूवार, 6 ऑगस्ट रोजी सकाळी प्रादेशिक वन विभागाच्या पथकाने त्यास ‘रेस्क्यू’ करून जेरबंद केले. परंतु, जेरबंद केल्यानंतर काही वेळातच बिबट्याचा पिंजर्‍यात मृत्यू झाला.
 
 
tleopard died
 
खडसंगी जवळ मागील 5 वर्षाआधी नवेगाव पुनर्वसन वसले आहे. खडसंगी सभोवताल ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असून, गावात वन्यप्राणी येण्याचा नेहमीचाच वावर असतो. त्यामुळे एक बिबट तुकाराम शेंडे यांच्या घराजवळील परिसरात बसला होता. तुकाराम शेंडे यांच्या घराला लागून असलेल्या गायकवाड यांच्या घरच्या कोंबड्या त्याने फस्त केल्या होत्या. पहिल्या दिवशी फटाके फोडून या बिबट्याला हाकलून लावले. तर दुसर्‍या दिवशी पुन्हा सायंकाळी तो तेथे बिबट येऊन बसला होता. घरातील व्यक्ती गुरांच्या गोठ्यात फावडा आणण्यासाठी गेला असता बिबट हालचाल करताना दिसला. त्यास नाकाजवळ जखम झाली होती. तसेच तो कमकुवत असल्याचे जाणवत होते.
 
 
या बिबट्याला पकडण्यासाठी वन परिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू करण्यात आले. अर्धा तासातच बिबट्याला पिंजर्‍यात जेरबंद करण्यात यश आले. बिबट्याला पकडून खडसंगी वन विश्रामगृहात आणण्यात आले. त्याच्यावर औषधोपचार करून चंद्रपूर येथील टीटी सेंटरला हलविण्यात येईल, असे सांगितले गेले. मात्र, वन विश्रामगृहात आणताच काही वेळात या बिबट्याने अखेरचा श्वास सोडला. शवविच्छेदन खडसंगी येथील वनविश्राम गृहातील परिसरात करण्यात आले. त्याचे हार्ट, किडनी, विसेरा, स्प्लीन आदी अवयव काढून फॅरेन्सिक तपासणी करिता पाठविण्यात आले. त्यानंतर याच ठिकाणी त्या बिबट्याचा दफनविधी झाला. यावेळी सहाय्य्क आयुक्त डॉ. ओवाळ, पशु वैधकीय अधिकारी डॉ. राहुल शेंद्रे, मानव वन्यजीव रक्षक अमोद गौरकार, वनक्षेत्र सहाय्यक निरलवार आदी उपस्थित होते.
 
चंद्रपूरला हलवण्याची प्रक्रिया होत असताना मृत्यूः देऊळकर
वन्य प्राण्यांच्या झुंजीत बिबट गंभीर जखमी झाला होता. रेस्क्यू करून त्याला औषधोपचार केले आणि चंद्रपूर येथे हलविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. मात्र, खडसंगी वन विश्रामगृह येथे आणल्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला., अशी माहिती प्रादेशिक वन परीक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर यांनी सांगितले.