पूर्वांचलाशी एकरूप झालेले वर्णेकर दाम्पत्य

    दिनांक :06-Aug-2026
Total Views |
दखल... विवेक गिरिधारी
purvanchal मूळ नागपूरचे अशोकराव व अलकाताई वर्णेकर हे दाम्पत्य गेली ३० वर्षे आसाममधील चहाच्या मळ्यातील अतिमागास जनजाती मजुरांच्या शैक्षणिक सेवाकार्यात रममाण झाले आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत पुण्यातील मातृमंदिर विश्वस्त संस्थेतर्फे त्यांना ६ ऑगस्ट रोजी एक लक्ष रुपयांचा ‘वा. ना. अभ्यंकर गुरुगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येत आहे. यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा सविस्तर परिचय करून देणारा हा लेख.
 
varnekar-couple
 
पूर्वांचलात काम करणाऱ्या मराठी कार्यकर्त्यांची मांदियाळी मोठी आहे. त्यापैकी सलग तीन तपे तेथे राहून काम करण्याची प्रदीर्घ तपश्चर्या करणाऱ्या मोजक्या मंडळींपैकी अशोकराव व अलकाताई वर्णेकर हे नागपूरचे एक आगळेवेगळे दाम्पत्य. आसाममधील चाय बागान आदिवासी जनजातीच्या प्रश्नांकडे समाजाचे व शासनाचे लक्ष वेधण्याचे मोठे कार्य त्यांच्या ३० वर्षांच्या मूलभूत कामामुळे घडून येत आहे. साऱ्यांसाठी भूषणावह असलेले हे सेवाकार्य व्यापक समाजापुढे आणण्याचे काम मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्या ‘गुरुगौरव पुरस्कारा’मुळे घडून येते आहे.
 
अशोकराव वर्णेकर यांचे वडील श्रीधर भास्कर वर्णेकर हे मोठे संस्कृत पंडित होते. अशोक वर्णेकर मूळचे नागपूरकर. त्यांचा जन्म २० सप्टेंबर १९५० चा. शिक्षण एम.एस्सी. (संख्याशास्त्र) व एम.एस्सी. (अर्थशास्त्र). शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी नागपूरच्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये दीड वर्षे नोकरी केली व नंतर दोन वर्षे नागपूर विद्यापीठात अध्यापन केले. मे १९७७ मध्ये लग्न झाल्यावर पुढच्याच वर्षी ते मुंबईत दाखल झाले. तेथील दोन वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी वेगळी वाट चोखाळावी म्हणून इकॉनॉमिक टाईम्सच्या रिसर्च ब्युरोत पत्रकार म्हणून काम केले. अलकाताई यांचा जन्म १९५६ सालातील. अलकाताईंनी एम.एस्सी. (संख्याशास्त्र) केले. १९७६ च्या आंध्रवादळाच्या मदतकार्यात अलकाताईंचा सक्रिय सहभाग होता.
 
 
अरुणाचल प्रदेशात...
सामाजिक काम करण्याची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण करण्यासाठी अशोकराव वर्णेकर यांनी १९८० मध्ये त्यांचा मुलगा अवघा दीड वर्षाचा असताना मुंबई सोडून अरुणाचलमध्ये पत्नीसह जाण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यावेळेस ते मुंबईत अगदी स्थिरस्थावर होण्याच्या मार्गावर होते. आरंभी अरुणाचल प्रदेशातील सेजोसा येथील विवेकानंद केंद्र विद्यालयात (व्हीकेव्ही) दोघांनी दोन वर्षे अध्यापक म्हणून ठरवून काम केले. स्थानिक समाजात अधिकाधिक मिसळण्याची संधी मिळावी म्हणून पुढील दोन वर्षे वर्णेकर यांनी डोनी पोलो विद्याभवनमध्ये प्राचार्य म्हणून काम केले. १९८४ मध्ये वर्णेकर यांनी डोनी पोलो मिशन स्कूलमधील नोकरी थांबवून नहारलगून येथे विद्यार्थी प्रावीण्य वर्ग ‘अरुणाचल युथ सेंटर’ या नावाने चालू केला.
 
आसाममधील कामास सुरुवात
१९८८ मध्ये मुंबईची सदनिका विकून त्यांनी लखीमपूर जिल्ह्यातील पार्वतीपूर(हारमती) येथे सुमारे एक एकर जागा विकत घेतली. तेथे लगेचच चाय बागान आदिवासी जनजाती समाजातील मुला-मुलींसाठी भास्कर संस्कार केंद्र सुरू केले. १९८८ ते एप्रिल २००० पर्यंतचा बारा वर्षांचा पार्वतीपूर येथील कामाचा त्यांचा पहिला टप्पा. नंतर २००८ पर्यंत त्यांना आई-वडिलांच्या आजारपणामुळे महाराष्ट्रात घरी थांबावे लागले होते. याच दरम्यान ते कौटुंबिक जबाबदाऱ्यांतून मुक्त झाले आणि पार्वतीपूरला परतले.
 
 
आसाम राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या २० टक्के हा चाय बागान आदिवासी जनजाती समाज आहे. या समाजाला विशिष्ट नावच नाही. खरे तर या समाजाला ओळखच नाहीये! जवळपास दोनशे वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी विविध राज्यांतून फसवून/पळवून चहाच्या मळ्यात आणलेले मजूर/गुलाम लोक हीच यांची खरी ओळख. तेलंगणा, विदर्भ, मध्यप्रदेश, झारखंड, ओडिशा, बिहार व बंगाल या राज्यांमधून फसवून, धाक अथवा प्रलोभने देऊन मोठ्या संख्येत आणला गेलेला हा मागास जातीतील मजूरवर्ग आहे आणि तो आसाममधील दुसऱ्या क्रमांकाचा प्रमुख समाज आहे.
 
भास्कर संस्कार केंद्राची सुरुवात
१९८८ मध्ये भास्कर संस्कार केंद्राची सुरुवात झाली. या समाजातील मुलांना शाळेची गोडी लावणे गरजेचे असले तरी जिकिरीचे होते. सध्या ७० मुले संस्कार केंद्रात निवासी असतात. चौथी ते महाविद्यालयीन शिक्षण घेणारी ही मुले आहेत. शरीर, मन व बुद्धी सतेज बनविण्यावर संस्कार केंद्रात भर असतो.
 
 
प्राथमिक शाळेची सुरुवात
१९९१ मध्ये लहान मुलांची शाळा चालू झाली. सुरुवातीला शाळेच्या चार झोपड्या बनल्या. संस्कार केंद्रात येणाऱ्या मुलांना त्यांच्या लहान भाऊ-बहिणींना पाठवण्यास सांगितल्यावर लहान मुलांचे येणे सुरू झाले. १९९९च्या सुमारास वनवासी कल्याण आश्रमाच्या सहकार्याने अनौपचारिक पद्धतीने चालणारी शाळा औपचारिक पद्धतीने नियमित भरायला लागली. आता तेथे बालगट ते ५ वी पर्यंत आसामी भाषेतील विद्याभारतीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्राथमिक शाळा नित्य भरत असते. यात १८० अनिवासी विद्यार्थी येतात.
 
२०१० पर्यंत इथे बांबूच्या इमारती होत्या. टप्प्याटप्प्याने सिमेंटच्या पक्क्या इमारती बांधणे सुरू आहे. या इमारतींसाठी देणग्या उभारण्यात व शाळा चालविण्यात नागपूरच्या उत्थान न्यासाचे मोठे योगदान आहे. नागपुरातील बजाजनगर प्रभात संघशाखेचीही मोलाची साथ आहे. लवकरच स्थानिक न्यासाची निर्मिती करून त्याकडे शाळा व्यवस्थापन व जागा हस्तांतरणासाठी पाठपुरावा चालू आहे.
 
 
ख्रिश्चन धर्मांतराचा मोठा धोका या समाजाला आहे. शासनाने पुढाकार घेऊन सदानी लोकांसाठी गेल्या दोन वर्षांमध्ये दोन टप्प्यात १८० शाळा उघडल्या आहेत. सध्या त्या ८ वी पर्यंत असून लवकरच १० वी पर्यंत होतील अशी अपेक्षा आहे. ही आशादायक घडामोड असली तरी शैक्षणिक गुणवत्ता हे मोठे आव्हान आहे. राष्ट्रवादी विचारधारेशी जवळीक सांगणाऱ्या संस्थांनी या समाजासाठी चालू करणे गरजेचे आहे. त्यातून सदानी समाजातील नव्या पिढीमध्ये आत्मसन्मान जागविण्याचे काम करता येईल.
 
९४२२२३१९६७