तुमसर,
tiger attacks तुमसर तालुक्यातील दावेझरी येथील रहिवासी बन्सीलाल मेश्राम (वय ५२) यांचा चुलडोहा (आगरी) बीट जंगल परिसरात वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार बन्सीलाल मेश्राम हे गुरे चारण्यासाठी चुलडोहा जंगल बिट परिसरात गेले होते. दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. हल्ल्यानंतर वाघाने त्यांना जंगलाच्या आत खेचून नेले. या भीषण हल्ल्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे दावेझरी व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, जंगलालगतच्या गावांमध्ये वाघाचा वाढता वावर लक्षात घेता वन विभागाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.