राजपाल यादवच्या अडचणीत वाढ; १६.६१ कोटींच्या थकबाकीमुळे बँकेकडून मालमत्तांचा लिलाव

    दिनांक :06-Aug-2026
Total Views |
मुंबई,
rajpal yadav बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव याच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे सध्या दिसत नाहीत. चेक बाऊन्स प्रकरणात न्यायालयाने दोषसिद्धी कायम ठेवल्यानंतर आता सेंट्रल बँक ऑफ इंडियाने त्याच्याविरोधात कर्जवसुलीची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे. तब्बल १६.६१ कोटी रुपयांची थकबाकी न भरल्याने बँकेने त्याच्या दोन गहाण मालमत्तांचा ताबा घेतला असून, ९ सप्टेंबर रोजी त्यांचा लिलाव करण्याची नोटीस जारी केली आहे.
 
 
rajpal yadav
 
 
बँकेच्या माहितीनुसार, लिलावासाठी ठेवण्यात आलेल्या मालमत्तांपैकी एक उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरच्या कचहरी रोड परिसरात असून, दुसरी मुंबईतील वांद्रे आणि वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) परिसरात आहे. या दोन्ही मालमत्ता कर्जाच्या हमी म्हणून गहाण ठेवण्यात आल्या होत्या.
राजपाल यादवने पत्नी राधा यादव आणि आई गोदावरी यादव यांच्या नावाने मुंबईतील सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून हे कर्ज घेतले होते. मात्र, नियोजित मुदतीत कर्जाची परतफेड न झाल्याने बँकेने दोन वर्षांपूर्वीच नोटीस बजावली होती. त्यानंतर कर्ज सेटलमेंटसाठी काही चर्चा झाल्या, मात्र तोडगा न निघाल्याने अखेर मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
या आर्थिक वादाचा संबंध २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अता पता लापता' या चित्रपटाशी जोडला जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः राजपाल यादव यांनी केले होते. चित्रपटाच्या निर्मितीसाठी बँकेकडून कर्ज घेण्यात आले होते. मात्र, चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे कर्जफेड रखडली आणि वाढत्या व्याजामुळे थकीत रक्कम १६.६१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली.
याआधी १० जुलै रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने चेक बाऊन्स प्रकरणात राजपाल यादव यांच्याविरोधातील दोषसिद्धी कायम ठेवत त्यांना सुनावण्यात आलेली शिक्षा कायम ठेवली होती. त्यानंतर आता बँकेच्या लिलावाच्या कारवाईमुळे त्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे.
या संपूर्ण प्रकरणावर राजपाल यादव यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, त्यांचे मोठे भाऊ श्रीपाल यादव यांनी माध्यमांशी बोलताना हे कर्ज प्रकरण जुने असल्याचे सांगितले.rajpal yadav बँकेसोबत तडजोडीच्या मार्गाने प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, २०१० मध्ये चित्रपट निर्मितीसाठी घेतलेल्या सुमारे ५ कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड न झाल्यामुळेच हा वाद सुरू झाला होता. कर्जफेडीसाठी देण्यात आलेले काही धनादेश बाऊन्स झाल्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर या प्रकरणात राजपाल यादव यांना न्यायालयीन कारवाईलाही सामोरे जावे लागले. आता थकीत कर्जाची वसुली करण्यासाठी बँकेने मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतल्याने या प्रकरणाची पुन्हा एकदा बॉलिवूड आणि आर्थिक क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.