आष्टी (श.),
accident in amravati अमरावती जिल्ह्यातील सावर्डी येथील जिओ पेट्रोल पंपाजवळ ५ ऑगस्टला रस्त्याचे बांधकाम करणार्या मजुरांना भरधाव असलेल्या ट्रकने धडक दिली. यात दोन मजुरांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला. सदर मजूर हे वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुयातील चिस्तूर येथील रहिवासी आहेत. देविदास पांडुरंग पाटील (४०) व मुकुंदा श्रीराम गणोरकर (६०) अशी मृतांची तर भूषण वाढोणकर (३५) असे गंभीर जखमीचे नाव आहे. जखमीला अमरावती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दिलीप मरापे व अशोक उके यांना किरकोळ दुखापत झाली.

प्राप्त माहितीनुसार, चिस्तूर येथील मजूर राष्ट्रीय महामार्गावरील काम करणार्या आरबीआय कंपनीत कार्यरत होते. कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मजूर ट्रकमधून उतरण्याच्या तयारीत असतानाच मागाहून आलेल्या भरधाव ट्रकने उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. यात दोन मजुरांचा मृत्यू, एक गंभीर तर दोघांना किरकोळ दुखापत झाली. मृतक देविदास पाटील हे भूमिहीन होते. तर पत्नी गृहिणी आणि त्यांचा मुलगा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. सुमारे पाच वर्षांपासून आरबीआय कंपनीत मजूर म्हणून काम करत होते. मृतक मुकुंदा गणोरकर यांच्याकडे अवघी एक एकर शेती आहे. ते मजुरी करून पत्नी, मुलाचे पालन पोषण करीत होते. तर त्यांची मुलगी विवाहित आहे. या घटनेमुळे चिस्तूर गावावर शोककळा पसरली आहे.