यश धुलची शतकी फटकेबाजी!

    दिनांक :06-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
yash dhull दिल्ली प्रीमियर लीग (डीपीएल) २०२६ मध्ये यश धुलने आपल्या तडाखेबाज फलंदाजीने पुन्हा एकदा क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. सेंट्रल दिल्लीकडून खेळताना त्याने अवघ्या ४७ चेंडूंमध्ये शतक झळकावत संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. त्याच्या या खेळीत ६ चौकार, ९ षटकार आणि तब्बल २१२.७७ चा स्ट्राईक रेट पाहायला मिळाला.
 
yash dhull
 
बुधवारी झालेल्या सामन्यात ओल्ड दिल्ली संघाने प्रथम फलंदाजी करताना १५ षटकांत ७ बाद १४० धावा उभारल्या. संघाकडून समर्थ सेठने २२ चेंडूंमध्ये ५ चौकारांच्या मदतीने ३२ धावांचे योगदान दिले. त्यानंतर अश्विन चिल्लरने २९ चेंडूंमध्ये ३८ धावा केल्या. अखेरच्या षटकांत त्याने आक्रमक फलंदाजी करत २१ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर ४६ धावांची खेळी साकारली.
 
१४१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सेंट्रल दिल्लीची पहिली विकेट लवकर पडली. सिद्धार्थ जून १३ चेंडूंमध्ये केवळ ८ धावा करून बाद झाला. मात्र त्यानंतर सलामीवीर यश धुलने जबरदस्त फटकेबाजी करत सामना पूर्णपणे आपल्या संघाच्या बाजूने झुकवला. त्याने ४७ चेंडूंमध्ये १०० धावांची तुफानी खेळी करत ओल्ड दिल्लीच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या युगल सैनीनेही २१ चेंडूंमध्ये २७ धावांची साथ दिली. यश धुलच्या शतकी खेळीच्या जोरावर सेंट्रल दिल्लीने अवघ्या १३.२ षटकांत लक्ष्य गाठत दणदणीत विजय नोंदवला.
 
यंदाच्या दिल्ली प्रीमियर लीगमध्ये एकूण ८ संघ सहभागी झाले असून सध्या सेंट्रल दिल्ली किंग्स (सीडीके) गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. स्पर्धेला ३१ जुलैपासून सुरुवात झाली असून अंतिम सामना ३० ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे. या स्पर्धेतील बहुतांश सामने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होत आहेत.