बोफोर्स तोफेची ४० वर्षे जुनी राजकीय धडधड शांत bofors-gun

सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले अंतिम अपील, हिंदुजा बंधुंवरील फौजदारी कारवाईची मागणी नाकारली

    दिनांक :07-Aug-2026
Total Views |

 

नवी दिल्ली
bofors-gun भारतातील सर्वांत कुप्रसिद्ध आणि दीर्घकाळ चाललेल्या बोफोर्स घोटाळ्याचा कायदेशीर आणि राजकीय अध्याय आता पूर्णपणे बंद झाला आहे. हिंदुजा बंधूंना निर्दोष ठरवणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या २००५ च्या निर्णयाविरोधात दाखल केलेली अंतिम याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने जवळपास ४० वर्षे जुन्या या प्रकरणाचा कायदेशीर शेवट झाला. १९८६ च्या संरक्षण कराराभोवतीचा वाद जवळपास ४० वर्षे न्यायालये आणि भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिला.


boforse gun 
 
 

न्या. जे. बी. परडीवाला आणि न्या. विनोद के. चंद्रन यांच्या न्यायासनासमोर झालेल्या सुनावणीत याचिकाकर्त्याचे वकील अजय के. अग्रवाल यांनी उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करण्याची आणि हिंदुजा बंधू, बोफोर्स कंपनीवर फौजदारी कारवाईचा आदेश देण्याची मागणी केली तसेच सीबीआयनेही या प्रकरणात अपील दाखल केले होते. न्यायासनाने विलंबाचे कारण देत याचिका फेटाळून लावली. सुनावणीदरम्यान, याचिकाकर्त्याच्या वकिलाने काही मृत प्रतिवादींची नावे वगळण्यासाठी चार आठवड्यांची मुदत मागितल्यावर न्या. परडीवाला यांनी कठोर भूमिका घेत म्हटले, हिंदुजा बंधू आणि सीबीआय यांच्यात हे सर्व काय चालले आहे, सर्व कार्यवाही रद्द झाली आहे, किती वर्षे उलटून गेली, तरीही पुन्हा पुन्हा एकच मुद्दा घेऊन तुम्ही येत आहात. या प्रकरणात आणखी विलंब किंवा सुनावणीला जागा नाही. आम्ही हे प्रकरण कायमस्वरूपी बंद करीत आहे, यापुढे सुनावणी घेणार नाही.


१९९० मध्ये पहिला एफआयआर

सीबीआयने या प्रकरणाचा तपास सुरू करीत जानेवारी १९९० मध्ये पहिला एफआयआर नोंदवला. ऑक्टोबर २००० मध्ये दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात हिंदुजा बंधूंची (श्रीचंद, गोपीचंद आणि प्रकाश हिंदुजा) नावेही यात समाविष्ट होती. परंतु. सीबीआय आरोपांना सिद्ध करण्यासाठी पुरेसे आणि विश्वासार्ह पुरावे देऊ शकली नाही. न्यायिक आधार नसलेल्या कागदपत्रांच्या आधारे कोणालाही आरोपी बनवणे योग्य नाही आणि यामुळे न्याय प्रक्रियेचा गैरवापर होईल असेल न्यायासनाने म्हटले.

 

तपासावर २५० कोटींचा खर्च; पण हाती काहीच नाही

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वीही सीबीआय या प्रकरणात काही नवीन माहिती शोधण्यात गुंतलेली होती. अमेरिकेच्या मायकल हर्शमन यांच्याशी संबंधित माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु सीबीआयने त्यांच्याशी संबंधित कागदपत्रे आणि नोंदी मागितल्या, तेव्हा काही विशेष हाती लागले नाही. या प्रकरणाच्या तपासावर सुमारे २५० कोटी रुपये खर्च झाले, परंतु एवढा पैसा खर्च करूनही ठोस पुरावे सादर करण्यात सीबीआय अपयशी ठरली.


संपूर्ण प्रकरण आणि त्याचा इतिहास काय ?

हे संपूर्ण प्रकरण भारत सरकार आणि स्वीडिश कंपनी एबी बोफोर्स यांच्यात २४ मार्च १९८६ रोजी झालेल्या १,४३७ कोटींच्या कराराशी संबंधित आहे. करारांतरगत भारतीय लष्करासाठी ४०० हॉवित्झर तोफा खरेदी करायच्या होत्या. १९८७ मध्ये, स्वीडिश रेडिओने करार मिळवण्यासाठी भारतीय राजकारणी आणि संरक्षण अधिकाऱ्यांना बेकायदेशीर लाच घेतल्याचा खुलासा केला. या खुलाशाने राजकारणात खळबळ उडाली. यानंतर राजीव गांधी सरकारवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव झाला.