नवी दिल्ली,
Aban's grave next to Atiq's grave माफिया नेता अतीक अहमदचा मुलगा आबान आणि त्याचा साथीदार सोनू यांचे मृतदेह शवविच्छेदनानंतर झाशीहून प्रयागराजला आणण्यात आले आहेत. अनेक वाहनांच्या ताफ्यातून दोन्ही मृतदेह हटवा गावात पोहोचवण्यात आले. सोनूवर हटवा गावातील दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, आबानला कसारी मसारी येथील वडिलोपार्जित दफनभूमीत दफन केले जाणार आहे.शुक्रवारच्या नमाजानंतर आबानचा दफनविधी होण्याची शक्यता आहे. कसारी मसारी येथील दफनभूमीत अतीक अहमदच्या कबरीशेजारी आबानसाठी कबर खोदण्यात आली आहे. याच दफनभूमीत अतीक अहमद, त्याचा भाऊ अश्रफ आणि मुलगा असद यांनाही दफन करण्यात आले आहे. आबानच्या अंत्यविधीच्या पार्श्वभूमीवर हटवा गावासह कसारी मसारी परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आबानचा गुरुवारी रस्ते अपघातात मृत्यू झाला. झाशी तुरुंगात असलेल्या आपला भाऊ अली अहमद याला भेटण्यासाठी तो मित्रांसोबत जात होता. पूंछ पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाशी-कानपूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव क्रेटा कार डिव्हायडरला धडकल्याने हा अपघात झाला. कारमध्ये पाच जण होते. या दुर्घटनेत आबान आणि सोनू यांचा मृत्यू झाला, तर आझम, मोहम्मद जावेद आणि उमर हे तिघे जखमी झाले. त्यांना झाशी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.
वरिष्ठ पोलीस अधीक्षक बीबीजीटीएस मूर्ती यांनी प्राथमिक तपासाचा हवाला देत कार भरधाव वेगाने जात असल्याचे सांगितले. दरम्यान, आबानच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी अतीकचा मोठा मुलगा मोहम्मद ओमर आणि धाकटा मुलगा अली अहमद यांनी उच्च न्यायालयात पॅरोलसाठी अर्ज केला आहे. या अर्जावर दुपारी १२:०० वाजता सुनावणी होण्याची शक्यता आहे. पॅरोल मंजूर झाल्यासच दोघांना अंत्यविधीला उपस्थित राहता येणार आहे. मोहम्मद ओमर लखनौ तुरुंगात, तर अली अहमद झाशी तुरुंगात आहे. आबानचा दफनविधी दुपारी ४:०० ते ५:०० वाजण्याच्या दरम्यान कसारी मसारी दफनभूमीत होण्याची शक्यता असून, त्यासाठी प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.