नवी दिल्ली,
BCCI strict on Team India भारतीय क्रिकेटपटूंच्या फिटनेसबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अधिक कठोर भूमिका घेतली आहे. खेळाडूंची तंदुरुस्ती सुधारण्यासाठी फिटनेस चाचणीचे निकष आणखी कडक करण्यात आले असून, आता ब्रॉन्को चाचणीसोबत २ किलोमीटर धावण्याची चाचणीही अनिवार्य करण्यात आली आहे. सेंटर ऑफ एक्सलन्सने २ किलोमीटरसाठी ९ ते १० मिनिटांची वेळमर्यादा निश्चित केली असून, खेळाडूंना ही धाव १० मिनिटांत पूर्ण करावी लागणार आहे.इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यादरम्यान भारतीय खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणातील काही त्रुटी आणि झेल सुटल्याने त्यांच्या फिटनेसबाबत चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर बीसीसीआयने फिटनेस मानकांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, वारंवार दुखापती आणि खेळाडूंच्या फिटनेसशी संबंधित बाबींवरून फिजिओ कमलेश जैन यांच्याबाबत बोर्डातील काही सदस्य नाराज होते.

ब्रॉन्को चाचणी ही भारतीय क्रिकेटमध्ये एड्रियन ले रूक्स यांनी सुरू केली होती. या चाचणीत ० ते ६० मीटर अंतरावर चार खुणा असतात. खेळाडूंना या अंतरावर आधारित एकूण १२०० मीटरचे पाच सेट विश्रांती न घेता पूर्ण करावे लागतात. यापूर्वी ही चाचणी पूर्ण करण्यासाठी सहा मिनिटांची वेळमर्यादा होती. आता ती कमी करून ५ मिनिटे १५ सेकंद ते ५ मिनिटे २० सेकंद करण्यात आली आहे.नव्या नियमामुळे खेळाडूंसमोरील आव्हान आणखी वाढले आहे. ब्रॉन्को चाचणी पूर्ण केल्यानंतर लगेच २ किलोमीटर धावण्याची चाचणी द्यावी लागणार आहे. त्यामुळे खेळाडूंच्या वेगासोबतच त्यांची सहनशक्ती आणि एकूण तंदुरुस्तीही तपासली जाणार आहे.
दरम्यान, काही खेळाडूंना फिटनेस चाचणीत तुलनेने सोपे निकष दिल्याच्या बातम्यांनंतर बीसीसीआयने कठोर भूमिका घेतल्याचे वृत्त आहे. सेंटर ऑफ एक्सलन्सच्या कर्मचाऱ्यांनी नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा यांना पूर्णपणे तंदुरुस्त नसतानाही फिटनेस मंजुरी दिल्याचा दावा काही अहवालांमध्ये करण्यात आला आहे. हर्षित राणाचे वजन ९७ किलोपर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात आले असून, आता बीसीसीआयने त्याचे वजन ९६ किलोपेक्षा कमी ठेवण्याचे स्पष्ट केले आहे. नव्या फिटनेस निकषांमुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना आता मैदानावरील कामगिरीसोबतच तंदुरुस्तीच्या चाचण्यांमध्येही कठोर मानकांची पूर्तता करावी लागणार आहे.