मातृशक्तीच्या सुरक्षित प्रवासासाठी बेस्ट प्रशासन सज्ज!

५०० कोटींच्या निधीतून बेस्टला संजीवनी; आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकाराने विशेष कृती आराखड्यावर मंथन

    दिनांक :07-Aug-2026
Total Views |
मुंबई,
mlc dr neelam gorhe मुंबईची लाईफलाईन असलेल्या बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी आता सर्वंकष कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. शिवसेना नेत्या आणि विधानपरिषदेच्या सदस्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे तसेच बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांच्या विशेष पुढाकाराने आज बेस्ट समितीच्या दालनात यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विविध ठोस उपाययोजनांवर सविस्तर मंथन करण्यात आले.
 
 
mlc dr neelam gorhe
 
बेस्टने 'एसओपी' तयार करावी : डॉ. गोऱ्हे
गेल्या दशभरातील महिला सुरक्षेसंदर्भातील अनुभवांचा आणि निर्णयांचा धांडोळा घेत, बेस्टने आता स्वतःची एक प्रमाणित मानक कार्यपद्धती (SOP) विकसित करावी, अशी महत्त्वपूर्ण सूचना आ. डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी केली. बसमधील अनुचित प्रकार रोखण्यासाठी घटनांचे विश्लेषण करून प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावी करता येतील, यावर त्यांनी भर दिला. कोरोनासारख्या भीषण संकटातही रात्री-अपरात्री प्रवास करणाऱ्या एकट्या महिला प्रवाशांना सुरक्षितपणे त्यांच्या घरापर्यंत पोहोचवणाऱ्या बेस्टच्या संवेदनशील चालकांचे त्यांनी यावेळी विशेष कौतुक केले.
 
 
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विशेष उपाययोजना
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिला सुरक्षेसाठी व्यापक जनजागृती मोहीम हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
 
 
यासह खालील मुद्द्यांवर बैठकीत विशेष लक्ष वेधण्यात आले:
महिला व मुलींसाठी दक्षता समित्यांची स्थापना.
 
महिला वाहकांच्या समस्यांचे प्राधान्याने निराकरण.
 बसथांबे आणि निर्जन परिसरांमध्ये पुरेशी प्रकाशव्यवस्था.
 
बस आगार आणि थांब्यांजवळ सुसज्ज स्वच्छतागृहांची उभारणी.
 महिलांसाठी स्वतंत्र 'व्हॉट्सॲप' तक्रार निवारण व्यवस्था.
 
सीसीटीव्ही यंत्रणेचे सक्षमीकरण आणि पुरुष रक्षकांप्रमाणेच महिला सुरक्षारक्षकांची नियुक्ती.
 
५०० कोटींच्या मदतीबद्दल मा. एकनाथराव शिंदेंचे आभार
बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून बेस्ट उपक्रमाला नुकताच ५०० कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युएटी (उपदान) आणि इतर प्रलंबित देणी वेळेत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथराव शिंदे यांनी घेतलेल्या या सकारात्मक पुढाकाराबद्दल डॉ. गोऱ्हे यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच, बेस्टच्या आर्थिक व प्रशासकीय बळकटीसाठी सातत्याने झटणाऱ्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांच्या प्रयत्नांचीही त्यांनी मुक्त कंठाने प्रशंसा केली.
 
 
सर्व सूचनांची सकारात्मक अंमलबजावणी होणार
अक्षरा सेंटरच्या नंदिता शहा यांनी या बैठकीत महत्त्वपूर्ण सादरीकरण केले. यात पोस्टर मोहिमेद्वारे जनजागृती, चालक-वाहकांना संवेदनशीलता प्रशिक्षण, सीसीटीव्ही यंत्रणा थेट हेल्पलाईनला जोडणे आणि नियमित 'जेंडर सेफ्टी ऑडिट' (लिंग सुरक्षा लेखापरीक्षण) राबविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. या सर्व सूचनांचा सकारात्मक विचार करून लवकरच महिला सुरक्षेसाठी आवश्यक तो धोरणात्मक कृती आराखडा अंमलात आणला जाईल, अशी ग्वाही बेस्ट अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी दिली.