‘आम्ही आईच्या मायेने झाडांचे संगोपन करणार’

हडसमधील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली भावना

    दिनांक :07-Aug-2026
Total Views |
वनविभागातर्फे रोपट्यांचे वाटप
 
 
नागपूर,
forest department वन विभागाच्या वतीने ‘एक पेड माँ के नाम’ या मोहिमेंतर्गत हडस हायस्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी वनसंपत्ती आणि प्राणी संरक्षणाविषयी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मोठ्या वृक्षांच्या रोपट्यांचे वाटपही करण्यात आले. आम्ही या रोपट्यांचे आईच्या मायेने संगोपन आणि संवर्धन करू, असा निर्धार यावेळी विद्यार्थ्यांनी बोलून दाखवला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून निसर्ग आणि वन्यप्राणी संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेचे प्रबंध संचालक धनंजय बापट हजर होते. यावेळी मुख्याध्यापिका प्राजक्ता गंगाखेडकर यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ताडोबाविषयीचा एक वृत्तपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला.
 
 
forest department
 
त्यानंतर विद्यार्थ्यार्शी संवाद साधताना धनंजय बापट म्हणाले, निसर्गातील प्रत्येक घटक आपला मित्र आहे. मात्र, त्याच्याशी आपण मैत्री केली पाहिजे. त्यासाठी त्याला समजून घेतले पाहिजे. आपली आई ज्याप्रमाणे आपला सांभाळ करते आणि प्रेमाने, मायेने आपले संगोपन करते तसेच आपण निसर्गातील वृक्ष, वेली आणि प्राण्यांच्या बाबतीत दृष्टिकोन ठेवला पाहिजे. निसर्ग संगोपन आणि संवर्धनाच्या उद्देशानेच ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम राबविला जात आहे. निसर्गाचा विशेषत: वन परिसरातील समतोल राखण्याची सर्वाधिक जबाबदारी वाघ या प्राण्यावर असते.
 
ताडोबा हे ठिकाण व्याघ्रदर्शनासाठी प्रसिद्ध आहे. पण, बहुतांश लोकांना अजूनही वाघ हा नरभक्षक, हिंस्र पशू वाटतो. प्रत्यक्षात तो माणसाला खात नाही. तो केवळ भितीपोटी मानवावर हल्ला करतो. वाघाच्या जन्मापासून त्याच्या जीवनक्रमातील अनेक रंजक गोष्टी यावेळी बापट यांनी विद्यार्थ्यांना सहज सोप्या करून सांगितल्या. कार्यक्रमाचे संचालन मीनल डोर्लीकर यांनी केले तर कार्यक्रमाला वन विभागाचे सहकारी उपस्थित होते.