बारामती,
'Drishyam'-style thriller in Baramati बारामती शहरात पतीला ठार मारून घरातच पुरण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ३८ वर्षीय शर्मिला प्रवीण जगताप हिने पती प्रवीण प्रकाश जगताप यांना आधी गुंगीचे औषध देऊन अर्धवट बेशुद्ध केले. त्यानंतर बॅटने मारहाण करून त्यांना घरातील गॅलरीत बांधलेल्या कट्ट्यात जिवंत पुरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.ही घटना बारामती शहरातील जामदार रोडवरील इंद्रप्रस्थ सोसायटीमधील फ्लॅट क्रमांक ९ येथे ३० जुलै २०२६ रोजी रात्री साडेअकरापासून १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी साडेअकराच्या दरम्यान घडल्याचे सांगण्यात आले आहे. प्रवीण जगताप यांना संपवून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने शर्मिला यांनी घराच्या हॉलला लागून असलेल्या गॅलरीत विटा आणि सिमेंटचा चौकोनी कट्टा बांधल्याचा आरोप आहे.

प्रवीण अर्धवट बेशुद्ध असताना त्यांना या कट्ट्यात झोपवून त्यावर कडप्पा फरशी लावून तो बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, हा प्रकार वेळेत उघडकीस आल्याने प्रवीण जगताप यांचा जीव वाचला. घटनेनंतर प्रवीण यांचे वडील प्रकाश जगताप यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून शर्मिला प्रवीण जगताप यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास बारामती शहर पोलीस करत आहेत. घरातच पतीला जिवंत पुरण्याच्या कथित प्रयत्नामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.