नाशिकच्या खड्ड्यांवर फडणवीसांचा संताप

    दिनांक :07-Aug-2026
Total Views |
नाशिक,
Fadnavis furious over Nashik's potholes नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा गंभीर प्रश्न आणि आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर महासिंहस्थ कुंभाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांची तातडीची आढावा बैठक घेतली. शहरातील विकासकामांमुळे रस्त्यांची अवस्था खराब झाली असून खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती बैठकीत समोर आली. वाढत्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये नाराजी असताना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना कामात हलगर्जीपणा न करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.“असं रिलॅक्स राहून चालणार नाही, महाकुंभ तोंडावर आहे,” अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. खड्डे बुजवण्याची जबाबदारी असलेल्या संबंधितांवर दंडात्मक कारवाई करा, तसेच त्यांचे पुढील काम थांबवा, असे निर्देश त्यांनी दिले. नागरिकांना केवळ कारणे सांगण्याऐवजी प्रत्यक्ष उपाययोजना करून त्यांना समाधान मिळाले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 
Fadnavis furious over Nashik
 
 
सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करण्याची गरज असून अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून न राहता प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. महाकुंभासाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक नाशिकमध्ये येणार असल्याने रस्ते आणि पायाभूत सुविधांची कामे अधिक गांभीर्याने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले. पुढील एका महिन्यात पुन्हा आढावा बैठक घेणार असून, त्यावेळी कामांमध्ये गुणात्मक सुधारणा दिसली पाहिजे, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.महाकुंभाच्या तयारीसाठी सुमारे ४० हजार कोटी रुपये खर्च केले जात असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली. त्यामुळे प्रत्येक प्रकल्प वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आऊटर रिंगरोड हा महत्त्वाचा प्रकल्प असून कंत्राटदारांसमोरील अडचणी दूर करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 
यंदाच्या महासिंहस्थ कुंभासाठी तब्बल १० ते १२ कोटी भाविक नाशिकमध्ये येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांच्या सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. शहरात हरित क्षेत्र वाढवण्यावरही भर दिला जाणार आहे. दरम्यान, रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची प्रशासनाने दखल घेतली आहे. मात्र, खड्ड्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावून रस्ते व्यवस्थित करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात नाशिकमधील रस्त्यांची स्थिती सुधारते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.