गोंदिया,
gang stealing batteries nabbed सालेकसा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावली येथील पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या ट्रक व ट्रॅक्टरमधून सात बॅटर्या चोरणार्या दोन आरोपींसह चोरीच्या बॅटर्या खरेदी करणार्या कबाडी दुकानदाराला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. आरोपींकडून चोरीच्या सात बॅटर्या असा एकूण ३७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी डोंगरगाव येथील कॉमेन्द्र खेमराज मेंढे यांनी ५ ऑगस्ट रोजी सालेकसा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार सावली येथील पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या तीन ट्रक व एका ट्रॅक्टरमधील सात बॅटर्या अज्ञात चोरट्याने लंपास केल्या होत्या. याप्रकरणी सालेकसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पोलिस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला असता तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छोटा गोंदिया येथील आतिष शंकर रहांगडाले (३१) आणि ऋत्विक बस्तीराम कंटकार (२५) या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत दोघांनी चारचाकी वाहन भाड्याने घेऊन सावली येथील पेट्रोल पंपाजवळून ट्रक व ट्रॅक्टरच्या सात बॅटर्या चोरल्याची कबुली दिली. चोरी केलेल्या बॅटर्या फुलचूर येथील प्रिन्स चौकातील कबाडी दुकानदार कैलास संजय चौधरी (३५) याला विकल्याचेही तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी कैलास चौधरी याच्या कबाडी दुकानातून चोरीच्या ३७ हजार रुपयांच्या सात बॅटर्या जप्त केल्या. तिन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी जप्त मुद्देमालासह सालेकसा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.