मुंबई,
making reels while on duty सध्या सोशल मीडियावर ‘रील्स’ आणि शॉर्ट व्हिडिओजचे फॅड वेगाने वाढत आहे. मात्र, प्रसिद्धीच्या या हव्यासापायी कर्तव्यात कसूर करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना आता एसटी महामंडळाने चांगलाच दणका दिला आहे. एसटीचे आगार, बसस्थानक किंवा बसमध्ये ड्युटीवर असताना अथवा गणवेशात रील बनवल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर थेट शिस्तभंगाची कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने दिला आहे.
एसटी महामंडळाने काढलेल्या नव्या परिपत्रकानुसार, कोणत्याही कर्मचाऱ्याला कर्तव्यावर असताना, कार्यालयीन परिसरात किंवा एसटीचा गणवेश परिधान करून सोशल मीडियासाठी व्हिडिओ, रील, यूट्यूब शॉर्ट्स किंवा लाईव्ह स्ट्रीमिंग करता येणार नाही. महामंडळाची प्रतिमा मलीन होईल किंवा लोकांमध्ये चुकीचा संदेश जाईल, असा कोणताही मजकूर प्रसारित करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
केवळ महामंडळाच्या योजना, प्रवासी सुविधा, स्वच्छता मोहीम किंवा जनजागृतीविषयी व्हिडिओ बनवायचा असल्यास, त्यासाठी आता सक्षम अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. विनापरवानगी परस्पर व्हिडिओ बनवणाऱ्यांवर थेट कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पनवेलमधील कारवाई ठरली ट्रिगर पॉईंट:
नुकतेच पनवेल आगारातील महिला वाहक नंदा कोळी आणि वाहतूक नियंत्रक विजय माने तसेच सुनील देशमुख यांनी नियंत्रण कक्षात एसटीच्या गणवेशात एक रील बनवले होते. फेसबुकवर हा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला आणि त्याला तब्बल साडेसात लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. हा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली. मुंबई विभागाने या तिन्ही कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत त्यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई केली. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांनी संपूर्ण राज्यात हे कडक नियम लागू करत, अशा बेशिस्त कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाईचे लेखी आदेश जारी केले आहेत.
लोकलमध्ये स्टंटबाजी करणाऱ्यालाही बेड्या
एकीकडे एसटी महामंडळाने रीलबाजीवर निर्बंध आणले असताना, दुसरीकडे रेल्वेमध्येही रीलसाठी जीवघेणे स्टंट करणाऱ्यांवर आरपीएफने कारवाईचा धडाका लावला आहे. धावत्या लोकलच्या दारात उभे राहून स्टंट करत इन्स्टाग्रामवर व्हिडिओ टाकणाऱ्या मोहम्मद कुरेशी या तरुणाला सीसीटीव्हीच्या आधारे अटक करण्यात आली आहे. केवळ 'लाईक्स' आणि 'फॉलोअर्स' वाढवण्यासाठी आपण हा स्टंट केल्याचे त्याने चौकशीत कबूल केले. या प्रकरणी रेल्वे न्यायालयाने त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.